पेट्रोल भरायला गेले तरी तिथेही त्यांचा फोटो असतो; अजितदादांची मोदींवर मिस्कील टीका

Ajit Pawar - PM Narendra Modi

पुणे :- उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज देशातील वाढत्या पेट्रोल-डिझेलच्या (Petrol-Diesel) किमतीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींसह (PM Narendra Modi) भाजपवर (BJP) शेलक्या शब्दांत टीका केली. पुण्यात कोरोना परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

अजित पवारांना कोरोना लसीकरण (Coronavirus Vaccination) प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोबद्दल विचारणा करण्यात आली. यावर  अजित पवारांनी आपल्या शैलीत उत्तर दिलं. ‘जाऊ द्या आता त्याला काय, पेट्रोल भरायला गेला तरी तिथेही त्यांचाच फोटो असतो. आता करता करणार काय? तिथे फोटो याच्यासाठी असेल की, १०० रुपये लिटरने तुम्ही पेट्रोल भरताहेत, तर त्यांच्या साक्षीने आपण भरतोय.’ असं पवार म्हणाले. तुमच्या प्रमाणपत्रावरही त्यांचा फोटो असेल का? असा  प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अजित पवार म्हणाले, ‘मी काय वेगळा लागून गेलोय का? तुमच्या-माझ्यासहित सर्वच नागरिकांच्या प्रमाणपत्रावर असणार. ते लोकशाही मार्गाने निवडून आलेले आहेत म्हणून त्यांनी ते आणलंय. त्याची पब्लिसिटी किती करावी? आम्ही प्रमाणपत्र देताना कुणाचेही फोटो… तसलं काही नाही केलेलं. माणसांना यातून कसं बाहेर काढता येईल, असा विचार केला पाहिजे, असेही पवार म्हणाले.

पुढे अजित पवार म्हणाले, भारत बायोटेकने जिल्ह्यात २८ एकर जमीन मागितली ती देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. तो प्रकल्प सुरू होण्यासाठी तीन महिने लागतील. तिथे तयार होणारी लस निम्मी केंद्राला द्यावी लागेल; पण राहिलेली लस महाराष्ट्राला मिळाली पाहिजे, असा आग्रह राहणार आहे. परंतु त्याआधी त्यांना आवश्यक गोष्टी उपलब्ध होतील. जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांनी तिथं भेट दिली. तिथं लाईट, पाणी वगैरे सुविधा तत्काळ दिल्या जात आहेत, अशी माहितीही पवार यांनी दिली.

ही बातमी पण वाचा : राज्य सरकार लस प्रमाणपत्रावरील मोदींचा फोटो हटवणार का? नवाब मलिक म्हणाले … 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button