शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीमध्ये जरी कमी जास्त झालं असलं तरी भविष्यकाळात त्याची भरपाई होणार : जयंत पाटील

Jayant Patil

सातारा :- पदवीधर, शिक्षक निवडणुकीत शिवसेना (Shivsena), काँग्रेस (Congress), राष्ट्रवादी (NCP) काँग्रेसमध्ये जरी कमी जास्त झालं असले तरी भविष्यकाळात त्याची भरपाई करणार आहे, असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले.

पदवीधर निवडणुकीत भाजपला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर आता महाविकास आघाडी सरकारला ‘एकीचे बळ’ लक्षात आलेले दिसत आहे. कारण भाजपला रोखण्यासाठी राज्यातील आगामी ग्रामपंचायत निवडणुकाही एकत्र लढण्याची तयारी महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) सुरू करण्यात आली आहे. गावागावात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे पदवीधर निवडणुकीचंच चित्र ग्रामपंचायत निवडणुकीत पाहायला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ग्रामपंचायत निवडणुकीतही एकत्र लढण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतलाय का?, असा प्रश्न त्यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारला. त्याला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटलांनी उत्तर दिलंय. ग्रामपंचायत निवडणुकीत कोणताही पक्ष चिन्हावर, एबी फॉर्मवर निवडणूक लढवत नाही. प्रत्येक गावातील वेगवेगळे प्रश्न घेऊन गट उभे राहत असतात, यामुळे ग्रामपंचायती निवडणुकांत पक्षाचे राजकारणाव्यतिरिक्त गावातील स्थानिक राजकारणावर निवडणूक चालत असतात, असंही ते म्हणाले.

शिवसेनेला शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीत मिळालेल्या अपयशाबाबत जयंत पाटलांना विचारले असता ते म्हणाले, विधानसभेची ही निवडणूक एकत्र लढून महाविकास आघाडीने उमेदवार उभे केले होते. त्यामध्ये काही ठिकाणी यश मिळाले. तर काही ठिकाणी अपयश मिळाले. कुणाला काय मिळाले ही परिस्थिती त्या ठिकाणच्या स्थानिक पातळीवर अवलंबून असते, असे सांगून शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जरी कमी जास्त झालं असले तरी भविष्यकाळात त्याची भरपाई होणार असल्याचे जयंत पाटील म्हणाले.

ही बातमी पण वाचा : काँग्रेसमध्ये बदलाचे वारे, मुंबई अध्यक्षदी मिलिंद देवरा?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER