लग्न वैध नसले तरी ती दोघे पती-पत्नीसारखे राहू शकतात

Punjab HC - Maharastra Today
  • आंतरधर्मीय दांपत्यास हायकोटाने दिले संरक्षण

चंदीगड : मुस्लिम मुलीने हिंदू धर्म न स्वीकारता हिंदू मुलाशी हिंदू रिवाजांनुसार केलेले लग्न कायद्याने वैध नसले तरी असे लग्न करणार्‍या दोन्ही व्यक्ती कायद्यानुसार लग्नाच्या वयाच्या असतील तर ती दोघं स्वच्छेने पती-पत्नीसारखे एकत्र राहू शकतात, असे पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

असे लग्न करणार्‍या दोन्ही व्यक्ती सज्ञान असल्याने त्या मर्जीनुसार कुठेही आणि कोणाच्याही सोबत राहू शकतात. त्यामुळे असे एकत्र राहण्यावरून इतर कोणीही त्यांना त्रास देऊ शकत नाही, असे नमूद करून न्यायालयाने या दांपत्यास संरक्षण देण्याचा आदेश पोलिसांना दिला.

१८ वर्षांच्या एका मुस्लिम मुलीने व २५ वर्षांच्या हिंदू मुलाने संरक्षणासाठी केलेल्या याचिकेवर न्या. अरुणकुमार त्यागी यांनी हा आदेश दिला. या दोघांनी मुलीच्या घरच्यांच्या विरोधाला न जुमानता १५ जानेवारी रोजी दुराना गावातील शिवमंदिरात हिंदू प्रथेनुसार विवाह केला होता. दोन्ही घरची मंडळी त्रास देतील म्हणून त्यांनी ही याचिका केली होती.

न्या. त्यागी यांनी त्यांना रीतसर विवाह केलेले पती-पत्नी म्हणून नव्हे तर पती-पत्नी म्हणून स्वेच्छेने एकत्र राहणार्‍या दोन सज्ञान व्यक्ती म्हणून संरक्षण दिले.

गेल्या महिन्यात याच न्यायालयापुढे एका मुस्लिम दांपत्याने अशीच संरक्षणासाठी केलेली याचिका आली होती. यात पती व पत्नी दोघेही मुस्लिम होते. परंतु यातील मुलीचे आधी लग्न झालेले होते व त्या पतीकडून रीतसर तलाक न घेता तिने दुसरे लग्न केले होते. न्या. अलका सरीन यांनी असा विवाह अवैध ठरविताना म्हटले होते की, मुस्लिम व्यक्तिगत कायद्यानुसार पतीला एकाहून अधिक विवाह करता येत असले तरी मुस्लिम पत्नीला ती मुभा नाही.

अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER