आता येथेही भाजपाची सत्ता राष्ट्रवादीकडे, २३ पैकी १८ नगरसेवक राष्ट्रवादीत

NCP - Sharad Pawar

बीड : माजलगाव नगराध्यक्षपदाच्या निवडणूक आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. आडसकर-जगताप वादाचा फायदा घेत राष्ट्रवादी काँग्रेसनं आणखी ६ नगरसेवक फोडले आहेत. त्यामुळे २३ पैकी १८ नगरसेवक राष्ट्रवादीत दाखल झाले आहेत. अंतर्गत गटबाजीमुळे भाजपची (BJP) सत्ता राष्ट्रवादीकडे (NCP) जाण्याची चिन्हे दिसत आहेत.

माजलगाव नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत एकहाती सत्ता मिळवण्यासाठी फोडाफोडीच्या राजकारणात साम, दाम, दंड, भेद या नीतीचा अवलंब राष्ट्रवादीने केला आहे. मोहन जगताप गटाचे २, माजी नगराध्यक्ष सहाल चाऊस गटाचे ३ व एमआयएमचा १ नगरसेवक असे एकूण सहा नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांनी आपल्या तंबूत आणले आहेत.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसकडून नगराध्यक्षपदासाठी शेख मंजूर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून त्यांच्याच नावावर नगराध्यक्षपदाचे शिक्कामोर्तब होणार आहे. दुसरीकडे, भाजपकडे स्पष्ट बहुमत असतानाही केवळ आडसकर-जगताप यांच्यातील गटबाजी, माजी नगराध्यक्ष चाऊस यांच्यावर पक्षातील नगरसेवकांनी केलेला अविश्वासाचा ठराव या कारणांमुळे पालिकेतील सत्ता हातून जाण्याच्या मार्गावर आहे. माजलगाव येथील नगराध्यक्ष सहाल चाऊस यांच्यावर तीन महिने गैरहजर राहिल्याचा ठपका ठेवत त्यांना बडतर्फ करण्यात आले होते. चाऊस यांच्यावर आमदार प्रकाश सोळंके यांच्या नेतृत्वाखाली अविश्वास ठराव दाखल करण्यासाठी सर्वपक्षीय नगरसेवक एकत्र आले होते. या पालिकेतील रिक्त नगराध्यक्षपदासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला.

भाजपच्या नगरसेविका रेश्मा दीपक मेंढके यांनी नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला आहे. परंतु, ही केवळ औपचारिकता आहे. भाजपचे नगरसेवक फुटून राष्ट्रवादीच्या गोटात दाखल झाल्याने भाजपची चांगलीच तारांबळ उडाली आहे. पुरेसे संख्याबळच नसल्यानं भाजपचं नगराध्यक्षपदाचं स्वप्न भंगलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER