खोऱ्याने धावा काढूनही पृथ्वी शॉ व पडीक्कल संघाबाहेरच, प्रसिध्द कृष्णा नवा चेहरा

Prasiddha Krishna - Prithvi Shaw - Padikkal - Maharastra Today

विजय हजारे ट्राॕफी स्पर्धेत एक द्विशतक आणि तीन शतकांसह आठ सामन्यांतच विक्रमी 827 धावा करुनही पृथ्वी शाॕ (Prithvi Shaw) हा इंग्लंडविरुध्दच्या (England) वन डे मालिकेसाठीच्या भारतीय संघात स्थान मिळवू शकलेला नाही. टी-20 सामन्यांतही यशस्वी पदार्पण केलेला इशान किशनही (Ishan Kishan) संघाबाहेर झालेला आहे. मात्र विजय हजारे ट्राॕफी स्पर्धेतच 14 विकेट मिळवलेल्या कर्नाकटच्या प्रसिध्द कृष्णा (Prasiddha Krishna) याला मात्र भारतीय संघात स्थान मिळाले आहे. इंग्लंडविरुध्दच्या या तीन सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघ शुक्रवारी जाहीर करण्यात आला. त्यात पृथ्वी शॉप्रमाणेच हजारे ट्रॉफीत खोऱ्याने धावा करुनही देवदत्त पडीक्कललाही (737 धावा) संघात स्थान मिळालेले नाही.

तामिळनाडूचा जलद गोलंदाज टी. नटराजन हा दुखापत व क्वारंटीनच्या अडचणीमुळे टी-20 सामन्यांच्या मालिकेला मुकला. त्याने वन डे संघातील आपले स्थान कायम राखले आहे.

टी-20 मध्ये केलेले चमकदार पदार्पणसुध्दा इशान किशनला संघात स्थान देऊ शकलेले नाही आणि टी-20 मालिकेत अपयशी ठरलेल्या के.एल.राहुलला यष्टीरक्षक म्हणून संघात स्थान मिळाले आहे. इशानसोबतच टी-20 मध्ये पदार्पण केलेला सूर्यकुमार यादव मात्र संघात कायम आहे. कुलदीप यादव व शुभमन गील हेसुध्दा संघात परतले आहेत. अष्टपैलू कृणाल पांड्या, शार्दुल ठाकूर व मोहम्मद सिराज हे संघात परतले आहेत. कृणालने विजय हजारे ट्रॉफीच्या सामन्यांमध्ये दोन शतकं व दोन अर्धशतकं केली आहेत.

  • शिवम शर्माने 21 आणि अर्झान नागवासवाला याने 19 विकेट काढल्या पण त्यांना संधी मिळालेली नाही.
  • टी-20 संघातील वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल, राहुल तेवटिया, दीपक चाहर व नवदीप सैनी यांना वगळण्यात आले आहे.
  • या मालिकेतील तिन्ही सामने 23, 26 व 28 मार्च रोजी पुणे येथे खेळले जाणार आहेत.

भारतीय संघ असा- विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, शुभमन गील, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, रिषभ पंत, के.एल.राहुल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, कृणाल पांड्या, वाॕशिंग्टन सुंदर, टी. नटराजन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद सिराज, प्रसिध्द कृष्णा, शार्दुल ठाकूर.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER