अजित पवारांच्या सल्ल्यानंतरही शिवसेनेकडून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पक्षप्रवेश

Ajit Pawar

सिंधुदुर्ग :- आपला पक्ष वाढवण्यासाठी कोणीही प्रयत्न करत असल्यास त्याला काहीही हरकत नाही. मात्र राज्यात आघाडीचे सरकार सत्तेत असताना मित्रपक्षाचेच कार्यकर्ते फोडण्यात कसली आघाडी? असा प्रश्न उपस्थित करत राष्ट्रवादीचे (NCP) नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश घडवू नये, असे यापूर्वी सांगितले आहे. परंतु कुणकेश्‍वर येथे पालकमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेशाचा कार्यक्रम घेऊन शिवसेनेने (Shiv Sena) याला हरताळ फासल्याची संतप्त प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे येथील ज्येष्ठ नेते नंदकुमार घाटे यांनी व्यक्‍त केली. याकडे अजित पवार यांचे लक्ष वेधणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

नुकतेच कुणकेश्‍वर येथे शिवसेनेने पक्षप्रवेशाचा कार्यक्रम घेतला. यावर राष्ट्रवादी पक्षाने तीव्र नाराजी व्यक्‍त केली. याबाबत पक्ष कार्यालयात तालुक्‍यातील कार्यकर्त्यांची बैठक घेतल्यानंतर घाटे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

यावेळी घाटे म्हणाले की, विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस पक्षाची महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सत्तेवर आली. त्यानंतर राज्यात आघाडीच्या घटक पक्षांचे कार्यकर्ते प्रवेश करण्यावरून मतभेद दिसून आले. यावर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी यापुढे मित्रपक्षातील कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश होणार नसल्याचे स्पष्ट केले होते. मात्र असे असताना तालुक्‍यातील कुणकेश्‍वर येथे पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेशाचा कार्यक्रम झाला. यामध्ये राष्ट्रवादी पक्षातील काही कार्यकर्त्यांचा प्रवेश झाला ही बाब अत्यंत संतापजनक आहे. तसेच महाविकास आघाडीचे नेते अजित पवार यांच्या सूचनांना हरताळ फासण्याचा प्रकार आहे.

याबाबत वरिष्ठ पातळीवर तक्रार करून नेतृत्वाचे याकडे निश्‍चितच लक्ष वेधणार आहे. त्यामुळे आघाडीतील घटक पक्ष असलेल्या दोन्ही मित्रपक्षांनी याची काळजी घेण्याचे आवाहन घाटे यांनी केले. आरोग्याचे प्रश्‍न, विजेचे प्रश्‍न सोडवण्याची आवश्‍यकता आहे. राज्यात महाविकास आघाडी सत्तेवर आल्यानंतर स्थानिक खासदार, पालकमंत्री यांना आमची नेहमीच सहकार्याची भावना राहिली आहे. त्यामुळे त्यांनीही पक्षप्रवेश घेताना याची काळजी घेणे आवश्‍यक होते. पक्ष जरूर वाढवा, मात्र मित्रपक्षांचे कार्यकर्ते पक्षात घेण्यात येऊ, असा सल्ला घाटे यांनी शिवसेना नेतृत्वाला दिला. यावेळी नंदकुमार घाटे यांच्यासह तालुकाध्यक्ष प्रकाश गुरव, माजी युवक जिल्हाध्यक्ष अभय बापट, विनायक जोईल, शरद शिंदे, दिवाकर परब, नागेश आचरेकर, सुमंत वाडेकर, पद्‌माकर राऊत आदी उपस्थित होते.

ही बातमी पण वाचा : नगरमध्ये भाजपला मोठा धक्का बसणार, अनेक नेते लवकरच राष्ट्रवादीत येण्याचा दावा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER