युरोप, अमेरिका, दिल्ली आणि आपण

Shailendra Paranjapeकोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागलीय. दसरा-दिवाळीला बाजारपेठेत झालेली गर्दी किती लोकांना कोरोनासंसर्ग घडवून गेली ते येत्या सात-आठ दिवसांत स्पष्ट होईल. नवी दिल्लीत कोरोनाची रुग्णसंख्या आवाक्याबाहेर जात असल्याने विनामास्क फिरणाऱ्यांवर कडक कारवाई करून दोन हजार रुपयांच्या दंडाची तरतूद करण्यात आलीय. दिल्लीत कोरोना वाढतोय, आता आपल्याकडेही बघा काय होतेय, दिवाळीत गर्दी केली लोकांनी… लोकांना गांभीर्यच नाही. अशी वाक्यं दैनंदिन गप्पांमध्ये ऐकू यायला लागलीत. महानायक अमिताभ बच्चन यांना हिंदी चित्रपटसृष्टीचा उल्लेख बॉलिवूड असा केलेला आवडत नाही.

ते हिंदी फिल्म इंडस्ट्री किंवा भारतीय सिनेसृष्टी असा शब्दप्रयोग आवर्जून करतात. त्याचं कारण सांगताना ते म्हणतात की, अमेरिकेतल्या हॉलिवूडप्रमाणे आपल्या चित्रसृष्टीला बॉलिवूड म्हणणे योग्य नाही. आपण कुणाचे अनुकरण करण्याचे कारण नाही. तीच गोष्ट जीवनाच्या विविध क्षेत्रांत लागू होते. आपल्या किंवा एतद्देशीय गोष्टींबद्दलचा अभिमान, स्वदेशी या सगळ्या शब्दांनाही राजकीय स्वरूप प्राप्त झाले. चीन वास्तविक कम्युनिस्ट राष्ट्र पण त्यांनी भांडवलशाहीचं मिश्रण त्यांच्या संपूर्ण व्यवस्थेत करून प्रगती साधली. तसंच कोणत्याही गोष्टीत राष्ट्राची प्रगती हा विचार अंगी बाणवण्याची गरज आहे. हे नव्यानं सांगण्याचं कारण जगातल्या काही देशांत कोरोनाची पुन्हा लाट आलीय म्हणून आपण बाऊ करू लागलोय. कोरोना संदर्भात लसविकसन होईपर्यंत मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि स्वच्छता ही त्रिसूत्री अंगीकारणं आवश्यक आहे.

तसंच युरोप-अमेरिकेत कोरोनाची लाट आली, हे लक्षात घेऊन पूर्वकाळजी घ्यायला हवी. पण मिशन बिगिन अगेन करून देशाची अर्थव्यवस्था रुळावर येऊ लागलीय तिला पुन्हा खीळ घालणं योग्य होणार नाही. तीच गोष्ट दिल्लीत वाढत असलेल्या कोरोना रुग्णसंख्येबाबतही लागू आहे. दिल्लीत कोरोना वाढतोय त्याची काही कारणं आहेत. नवी दिल्लीत उत्तरप्रदेश, बिहार या राज्यांतल्या नागरिकांची संख्या लक्षणीय आहे. दिल्लीला लागून असलेल्या राजस्थान, हरियाणा , उत्तरप्रदेश या राज्यांमधूनही दिल्लीत लोक जात-येत असतात. एकतर भौगोलिकदृष्ट्या नवी दिल्ली खूप विस्तारलेली आहे आणि सामाजिक पातळीवर दिल्लीत शिस्तीचा अभावही आहे. आपल्याकडे दिवाळीच्या गर्दीमुळे अनेकांना जी काळजी वाटतेय ती दिल्लीत रोजच्या रोज वाटेल, अशा प्रकारे लोक वागत असतात.

त्यामुळेच दिल्लीत कोरोना पुन्हा वाढतोय. अनेक देशांत पुन्हा कोरोनाची दुसरी लाट येत असल्याने किंवा दिल्लीत कोरोना वाढत असल्याने आपल्याकडेही तेच होईल, ही भीती अनाठायी आहे. पुण्यात किंवा मुंबईत साधे महापालिका क्षेत्रातले दोन शेजारी प्रभाग घेतले किंवा दोन विधानसभा मतदारसंघांचा जरी विचार केला तरी त्यातले नागरिक, त्यांचे वागणे, त्यांचे सामाजिक-आर्थिक स्तर, सांस्कृतिकता यात भिन्नता दिसून येते.

त्यामुळे मुंबईतल्या भेंडीबाजार, गिरगाव, ताडदेव यांची तुलना करता येत नाही तशीच ती पुण्यातल्या सदाशिव पेठ, शुक्रवार पेठ मंडई परिसर आणि गुरुवार पेठेतल्या लोकांचीही करता येत नाही. या भिन्नतेमुळेच कोरोनाचे कंटेन्मेंट झोन्स जाहीर केले गेले तेव्हा काही भागात कोरोना पसरला नाही, हे सहज लक्षात येते. त्याची कारणेही लक्षात येतात. त्यामुळे कोरोनाबद्दल पूर्वकाळजी घेतली तर फार घाबरण्याचं कारण नाही.

मुंबईत सर्वसामान्यांसाठी लोकलसेवा सुरू होणं आता थोडं अवघड आहे, असं मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितलंय. ते योग्यही असेल; पण हळूहळू सामान्य जनजीवन सुरू व्हायला हवं आणि योग्य ती पूर्वकाळजीही घ्यायला हवी, तरच कोरोनाबरोबर जगण्याची सवय होऊ शकेल.

शैलेंद्र परांजपे

Disclaimer :- ‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER