कुटुंबाच्या मोहातून मुक्त होऊन पक्षात लोकशाही प्रस्थापित करा; पक्षाच्या नेत्यांचे सोनिया गांधींना पत्र

Congrss

नवी दिल्ली : कुटुंबाच्या मोहातून मुक्त होऊन पक्षात लोकशाही प्रस्थापित करा, अशी मागणी उत्तरप्रदेश काँग्रेसचे काही माजी खासदार – मंत्री व स्थानिक नेत्यांनी काही दिवसांपूर्वी पक्षाच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांना केली आहे. यासंदर्भात उल्लेखनीय आहे की, कॉंग्रेसच्या २३ ज्येष्ठ नेत्यांनी काही दिवसांपूर्वी सोनिया गांधी यांना पत्र पाठवून पक्षात संघटनात्मक पातळीवर तातडीने सुधारणा करून पक्षासाठी पूर्ण वेळ अध्यक्ष निवडण्याची मागणी केली होती. आता उत्तरप्रदेशमधील काही नेत्यांनी हा पत्रबॉम्ब टाकला आहे. यामुळे पुन्हा एकदा पत्रावरून काँग्रेसचे राजकारण ढवळून निघण्याची शक्यता आहे.

उत्तरप्रदेशमधील माजी खासदार, संतोष सिंह, माजी मंत्री सत्यदेव त्रिपाठी, माजी आमदार विनोद चौधरी, भूधर नारायण मिश्रा, नेकचंद पांडे, स्वयं प्रकाश गोस्वामी आणि संजीव सिंह या नेत्यांच्या पत्रावर स्वाक्षरी आहेत. कॉंग्रेसच्या सरचिटणीस आणि उत्तरप्रदेशच्या प्रभारी प्रियंका गांधी-वढेरा यांना अपत्यक्षपणे लक्ष्य करत सोनिया गांधींना कुटुंबाच्या मोहातून मुक्त होऊन पक्षाची लोकशाही परंपरा पुन्हा प्रस्थापित करण्याचे आवाहन केले आहे.

काँग्रेसचे सर्वांत वाईट दिवस
उत्तरप्रदेशमध्ये काँग्रेस पक्ष सध्या सर्वांत वाईट काळातून जात आहे. राज्य प्रभारी तुम्हाला सद्य:स्थितीबद्दल माहिती देत नसावेत. आम्ही एका वर्षापासून भेटण्यासाठी तुम्हाला वेळ मागत आहोत. पण, वेळ मिळत नाही. आमच्या हद्दपारीविरोधात आम्ही अपील केले होते. परंतु, समितीलासुद्धा आमच्या अपीलवर विचार करण्यासाठी वेळ मिळाला नाही. आम्हाला माध्यमांमधून आमच्या हद्दपारीविषयी माहिती मिळाली होती.

जे लोक पगाराच्या आधारावर काम करतात आणि पक्षाचे प्राथमिक सदस्यही नाही. त्यांच्याकडे पक्षाची पदे आहेत. हे नेते पक्षाच्या विचारधारेशी परिचित नाहीत, परंतु त्यांना उत्तरप्रदेशमध्ये पक्षाला दिशा देण्याचे काम देण्यात आलेले आहे! हे लोक १९७७ – ८० च्या संकटकाळात कॉंग्रेसबरोबर उभे राहिलेल्या नेत्यांच्या कामगिरीचे आकलन करत आहेत! लोकशाही निकष मोडकळीस आणले आहेत. ज्येष्ठ नेत्यांना लक्ष्य केले जात असून त्यांचा अपमान केला जात आहे आणि पक्षातून हाकलले जात आहेत.

नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये संवाद नाही, असाही आरोप पत्रात करण्यात आला आहे. उत्तरप्रदेशमधील एनएसयूआय आणि युवा कॉंग्रेस निष्क्रिय झाले आहेत. सध्याच्या घडामोडींकडे डोळेझाक केली गेली तर एकेकाळी पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या उत्तरप्रदेशमध्ये कॉंग्रेसचे मोठे नुकसान होईल, असा इशारा पत्रात देण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER