मारहाण प्रकरण गायकवाडांच्या अंगलट येण्याची शक्यता

नवी दिल्ली : विमान प्रवासादरम्यान झालेल्या बाचाबाची नंतर शासकीय विमानसेवा कंपनीच्या कर्मचाऱ्याला चपलेलने मारहाण केल्याप्रकरणी सेनेचे खासदार वीरेंद्र गायकवाड यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न करण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे खासदार वीरेंद्र गायकवाड यांना हे प्रकरण चांगलंच भोवणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. मारहाणीचे हे प्रकरण इतके चिघळले कि, त्यांच्यावर हवाईप्रवासबंदी घालण्याचा निर्णय एअर इंडियासहित भारतीय विमान कंपन्यांच्या महासंघाने (फेडरेशन ऑफ इंडियन एअरलाइन्स : ‘एफआयए’) घेतला, तर दुसरीकडे दिल्ली पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध थेट सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न केल्याबद्दलचा गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याला तीन वर्षांपर्यंतच्या तुरुंगवासाची शिक्षा आहे.

शासकीय कर्मचारी कर्तव्यावर असतांना मारहाण केल्याप्रकरणी ‘आम्ही खासदार गायकवाड यांच्याविरुद्ध भारतीय दंडविधानातील कलम ३०८ (सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न : ‘कल्पेबल होमिसाइड नॉट अमाउटिंग टू मर्डर’) आणि ३५५ (गुन्हेगारी हेतूने अप्रतिष्ठा) नुसार गुन्हा दाखल केला आणि सखोल चौकशीसाठी तपास गुन्हे अन्वेषण विभागाकडे (क्राइम ब्रँच) सोपविला आहे,’ अशी माहिती दिल्ली पोलिसाचे प्रवक्ते दीपेंद्र पाठक यांनी दिली आहे.

दरम्यान, दुसरीकडे गायकवाड यांनीही सुकुमार आणि एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांविरुद्ध संसद मार्ग पोलीस स्थानकामध्ये तक्रार नोंदविली. त्यामध्ये शिवीगाळ करण्याचा, अप्रतिष्ठा करण्याचा आणि धमकी देण्याचा आरोप आहे. तक्रार देताना गायकवाड यांच्यासोबत चंद्रकांत खैरे, राहुल शेवाळे, श्रीकांत शिंदे आदी खासदार उपस्थित असल्याचे समजते.

दुसरीकडे सकाळी शिवसेना खासदार अरविंद सावंत यांच्या घरी काही खासदारांची अनौपचारिक बैठक झाली. त्यात श्रीरंग बारणे, राहुल शेवाळे, डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासह आणखी काही खासदार सहभागी होते. काही वकिलांचा त्यावेळी सल्ला घेण्यात आला. पण बैठकीचे वृत्त सावंतांनी स्पष्टपणे फेटाळले. मिळालेल्या माहितीनुसार, या मुद्दय़ावरून सोमवारी संसदेमध्ये खासदारावरील अन्यायाचा मुद्दा आक्रमकपणे मांडण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर एअरम् इंडियाचे प्रमुख अश्विनी लोहानी यांना भेटण्याचेही ठरविण्यात आले.

खासदार गायकवाड यांना फेडरेशन ऑफ इंडियन एअरलाइन्सने (एफआयए) पाच कंपन्यांच्या विमानांत त्यांना तिकीटच न देण्याचा निर्णय शुक्रवारी घेण्यात आला. यामुळे आता रेल्वेने प्रवास करण्याशिवाय दुसरा पर्याय त्यांच्यासमोर उरला नाही. खासदार गायकवाड हे रात्री दिल्लीहून ऑगस्ट क्रांती एक्स्प्रेस या रेल्वेने मुंबईत आले. प्रवासादरम्यान कोटा रेल्वे स्थानकावर पत्रकारांशी त्यांची वादावादी झाल्याचेही वृत्त आहे. गायकवाड यांच्याविरुद्ध गुन्हाही दाखल झाल्याने त्यांना अटक होण्याचीही शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.