
आयपीएल लिलावात (IPL Auction) खेळाडूंवर पडलेला पैशांचा पाऊस पाहता सर्वांचेच डोळे विस्फारले आहेत. या खेळाडूंवर फ्रँचाईजी एवढा पाण्यासारखा पैसा कसा ओततात? एवढ्या पैशांचे हे खेळाडू करतात काय? हे पैसे त्यांनाच मिळतात की त्याची कुणात विभागणी होते? आणि या खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळू देण्याची परवानगी त्यांची मंडळे कशी देतात? यात त्यांचा काय फायदा? याची उत्सुकता सर्वांनाच आहे.
याबाबत तीन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. पहिली म्हणजे लिलावात खेळाडूला जी काही रक्कम मिळते ती सर्वच्या सर्व त्याची असते. अर्थात त्याला स्थानिक नियमांनुसार कर लागतात. याचाच अर्थ यंदा ख्रिस मॉरिससाठी (Chris Morris) राजस्थान रॉयल्सने (Rajstan Royals) जी १६.२५ कोटींची विक्रमी बोली लावली ती सर्वच्या सर्व रक्कम (कर वजा जाता) त्याला मिळणार आहे.
दुसरी गोष्ट म्हणजे ही रक्कम फक्त एक वर्षासाठी म्हणजे आयपीएल २०२१ साठी असेल आणि राजस्थान रॉयल्सला पुढच्या वर्षी त्याला संघात कायम राखायचे असेल तर किमान एवढीच किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम द्यावी लागेल.
तिसरी गोष्ट म्हणजे खेळाडूला जी रक्कम मिळते त्याच्या २० टक्के रक्कम त्याच्या क्रिकेट मंडळाला मिळते. याचा अर्थ हा, की यंदा ख्रिस मॉरिसला १६.२५ कोटी मिळणार आहे. त्यामुळे त्याच्या दक्षिण आफ्रिकन क्रिकेट मंडळाला ३ कोटी २५ लाख मिळतील. आयपीएलच्या सेंट्रल रेव्हेन्यूमधून हे पैसे मिळतील.
खेळाडूंना पैसे देण्याची प्रत्येक फ्रँचाईजीची पद्धत वेगवेगळी असते. काही फ्रँचाईजी खेळाडूंना एकगठ्ठा रक्कम देतात. सहसा स्पर्धा सुरू होण्याच्या आधीच्या पहिल्या सराव शिबिरावेळी ही रक्कम दिली जाते. काही फ्रँचाईजी ५० टक्के रक्कम आधी आणि ५० टक्के रक्कम स्पर्धेदरम्यान देतात. काही फ्रँचाईजी १५ टक्के रक्कम आयपीएलच्या आधी, ६५ टक्के रक्कम स्पर्धेदरम्यान आणि २० टक्के रक्कम स्पर्धा संपल्यानंतर देतात.
यंदाच्या आयपीएल लिलावात परदेशी खेळाडूंना मिळालेल्या किमती पाहता ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका व न्यूझीलंड ही क्रिकेट मंडळे मालामाल होणार आहेत.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला