B’day Special: आयर्लंडमध्ये जन्मला, परंतु या कर्णधाराने इंग्लंडला जिंकवून दिला विश्वचषक

Eoin Morgan

२००६ मध्ये आयर्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (International cricket) पदार्पण केले होते, परंतु २००९ मध्ये इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली.

चार दशकांपासून एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या प्रतीक्षेत इंग्लंडचा संघ २०१९ मध्ये विजेता ठरला आणि इंग्लंडला विश्वचषक जिंकवून देणारा कर्णधार ठरला इयोन मॉर्गन (Eoin Morgan). आज १० सप्टेंबरला मॉर्गन आपला ३४ वा वाढदिवस साजरा करीत आहे. मॉर्गनचा जन्म आयर्लंडच्या डबलिनमध्ये झाला होता आणि त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटची सुरवात आयर्लंडबरोबर केली, त्याने २००६ मध्ये आयर्लंडकडून पदार्पण केले. त्यानंतर तो इंग्लंडला शिफ्ट झाला आणि २००९ मध्ये त्याने इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायला सुरुवात केली.

डाव्या हाताच्या या फलंदाजाने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये दोन्ही देशांच्या वतीने शतके ठोकली आहे. तसेच मॉर्गन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण सामन्यात ९९ धावांवर बाद झालेला जगातील एकमेव क्रिकेटपटू आहे, २००६ मध्ये आयर्लंडकडून खेळत असताना स्कॉटलंडविरुद्ध ९९ धावा करुन तो धावबाद झाला होता. मॉर्गनला २०१५ एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या अगोदर अ‍ॅलिस्टर कुकच्या जागी इंग्लंड संघाची कमान देण्यात आली होती. हा विश्वचषक इंग्लिश संघासाठी काही खास नव्हता, परंतु त्यानंतर मॉर्गनच्या नेतृत्वात इंग्लंडने वन डे सामन्यात शानदार कामगिरी दाखवली.

जून २०१५ ते जुलै २०१८ दरम्यान इंग्लंडने १६ द्विपक्षीय एकदिवसीय मालिका खेळल्या त्यापैकी ते १३ मालिका जिंकण्यात यशस्वी झाले. या कामगिरीमुळे त्याला २०१९ च्या विश्वचषकातही कर्णधारपद देण्यात आले आणि त्याने आपल्या देशाला निराश होऊ दिले नाही आणि ते प्रथमच विश्वविजेते बनले. इंग्लंडला विश्वकरंडक जिंकण्यासाठी केवळ कर्णधारपदातच नव्हे तर फलंदाजीद्वारेही मॉर्गनने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

तुम्हाला सांगूया की मॉर्गनने २३९ एकदिवसीय सामन्यांमध्ये ३९.७३ च्या सरासरीने ७,५१० धावा केल्या आहेत. यात १४ शतके आणि ४६ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याचबरोबर मॉर्गनने आंतरराष्ट्रीय टी -२० सामन्यांमध्ये ३०.२७ च्या सरासरीने २,२४० धावा केल्या आहेत. याशिवाय त्याने १६ कसोटी सामन्यांमध्ये ३०.४३ च्या सरासरीने ७०० धावा केल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER