थिएटरच्या बरोबरीने ओटीटी प्लॅटफॉर्मवर या वर्षी मनोरंजनाचा पेटारा उलगडणार

2020 मध्ये बॉलिवूडला (Bollywood) फार मोठे नुकसान झाले होते. थिएटर बंद असल्याने लोकांना मनोरंजनाचे साधन नव्हते. याच वेळी ओटीटी प्लॅटफॉर्मनी घरात बसलेल्यांसाठी मनोरंजनाचे नवे दालन उघडून दिले होते. प्रेक्षकांनी ओटीटी प्लॅटफॉर्म्सना डोक्यावर घेतले होते. प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहून ओटीटी प्लॅटफॉर्म कंपन्यांनी बॉलिवूड कलाकारांचे सिनेमे मोठ्या रकमेला घेऊन ते प्रदर्शित केले. एवढेच नव्हे तर मोठ्या कलाकारांना घेऊन विविध विषयावरील वेब सीरीजही तयार केला. यामुळे आता ओटीटीचाच जमाना असे म्हटले जाऊ लागले होते. मात्र 2021 मध्ये थिएटरमध्ये प्रेक्षकांना येण्याची परवानगी सरकारने दिली आणि बॉलिवूड खडबडून जागे झाले. यावर्षी प्रत्येक शुक्रवारी दोन ते तीन मोठे सिनेमे रिलीज होणार आहे. बॉलिवूड निर्माते आणि कलाकारांनी तर पुढील वर्षीच्याही थिएटरच्या तारखा बुक करून ठेवल्या आहेत. यामुळे प्रेक्षक पुन्हा थिएटरकडे वळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. हा प्रेक्षक आपल्याकडेच राहावा यासाठी ओटीटी प्लॅटफॉर्मसही विविध नवे सिनेमे आणि कार्यक्रम घेऊन येणार आहेत.

ओटीटी प्लॅटफॉर्म्सच्या (OTT Platform) जगात नेटफ्लिक्स (Netflix) ही एक मोठी कंपनी आहे. या कंपनीने निर्माते आणि कलाकारांच्या धर्तीवर 2021 मध्ये प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी पेटारा उघडण्याची घोषणा केली आहे. नेटफ्लिक्सने 41 नव्या टायटल्सची घोषणा केली असून यात 13 नवे सिनेमे, 15 वेब सीरीज, 4 डॉक्यूमेंट्री, 6 स्टँड अप कॉमेडी स्पेशल आणि 3 रियलिटी शोचा समावेश आहे. यात बॉलिवूडमधील माधुरी दीक्षित, धनुष, बॉबी देओल, अर्जून कपूर, मनोज वाजपेयी, सोनाक्षी सिन्हा, तापसी पन्नू, अर्जुन रामपाल, कार्तिक आर्यन, सान्या मल्होत्रा, कपिल शर्मा, नीना गुप्ता, नुसरत भरुचा, कोंकणा सेन शर्मा, अदिती राव हैदरी, शेफाली शाह, असे मोठे कलाकार दिसणार आहेत. नेटफ्लिक्ससाठी करण जोहर, अनुष्का शर्मा कार्यक्रम तयार करणार आहेत. करण जोहरने खास ओटीटीसाठी तयार करण्यात आलेल्या त्याच्या नव्या डिजिटल एंटरटेमेंट कंपनी धर्माटिकच्या वतीने चार नव्या प्रोजेक्टची घोषणा केली. नीना गुप्ता आणि मसाबा ही ‘मसाबा मसाबा’ सीरीजचा दुसरा भाग घेऊन येणार आहे.

नेटफ्लिक्सवर अजीब दास्तांस (निर्माता करण जोहर, दिग्दर्शक नीरज घेवान), बुलबुल तरंग (सोनाक्षी सिन्हा), धमाका (कार्तिक आर्यन), द डिसायपल (चैतन्य ताम्हाणे), हसीन दिलरुबा (तापसी पन्नू), जगमे थंदीराम (धनुष), मीनाक्षी सुंदरेश्वर आणि पगलेट (सान्या मल्होत्रा), नवरस (मणि रत्नम), पेंटहाउस (अब्बास मस्तान), सरदार का ग्रँडसन (नीना गुप्ता, अर्जुन कपूर) हे नवे सिनेमे नेटफ्लिक्सवर रिलीज केले जाणार आहेत.

याशिवाय माधुरी दीक्षित ‘फाईंडिंग अमेरिका’, रवीना टंडन ‘अरण्यक’, अनुष्का शर्मा ‘मैं’ नावाची वेबसीरीज घेऊन येणार असून माधवनची डिकपल्ड, दिल्ली क्राइम सीझन 2, जमात्रा- सीझन 2, इम्तियाज अलीची ‘शी- सीझन 2’ या वेबसीरीजही रिलीज केल्या जाणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER