मंगळवारपासून कोटा ठरवून कोल्हापुरात प्रवेश : सतेज पाटील

Satej Patil

कोल्हापूर : वृत्तसेवा कोल्हापुरात मुंबईनंतर सर्वाधिक स्वॅब टेस्टिंग केले जातात. आतापर्यंत एक लाख ५७ हजार तर ३ ते २० मेदरम्यान ४० हजार लोक आले. त्यातील २५ हजार लोक रेडझोन मधील आहेत. योग्य नियोजन असल्याने आकडा वाढला म्हणून लोकांनी घाबरु नये. सध्या रोज २१०० स्वॅब टेस्टिंग क्षमता आहे. ती अजून वाढवली जाईल. पुढील तीन दिवसात सर्व टेस्टींग पूर्ण झाल्यानंतर २६ मेपासून जिल्हा प्रवेशाबाबत कोटा ठरविला जाईल. कोणत्या तालुक्यातील किती लोक आहेत ? याची परिपूर्ण माहिती घेऊनच प्रवेश देत, नियोजन केले जाणार असल्याची माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली.

सतेज पाटील म्हणाले, कोरोना महामारीत प्रशासन नियोजनबध्द काम करत आहे.कोल्हापुरात कोणालाही प्रवेश बंदी केलेली नाही. पूर्व परवानगी शिवाय लोक पाठवू नका, असे रेड झोनमधील जिल्ह्यांना कळविले आहे. २५ मेपर्यंत कोल्हापुरात आलेल्या सर्व कोरोना संशयितांच्या स्वॅब टेस्टींगचे अहवाल येतील. त्यानंतर नवीन लोकांना प्रवेश दिला जाईल. सध्या २१०० इतकी स्वॅब तपासणी क्षमता अजून वाढविली जाईल. कोल्हापुरात स्वॅब टेस्ट मोठ्या प्रमाणात होत असल्यानेच कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याचे दिसते. सामाजिक संक्रमण होणार नाही याची परिपूर्ण काळजी घेतली जात आहे. त्यामुळे धोका नाही. २६ मेनंतर स्वॅब टेस्टींग आणि अलगीकरणाची क्षमता पाहूनच कोटा ठरवून प्रवेश दिला जाईल. नेमक्या कोणत्या तालुक्यात कोठून किती लोक येणार आहेत हे समजेल. त्यामुळे नियोजन करणे सोपे होणार आहे.

पुण्यामुंबईतून येणारे लोक हे आपले बांधव आहेत. त्यांच्याकडे उपहासाने पाहू नका. त्यांच्या अडचणीत वाढ होईल. वातावण बिघडेल असे कोणी वागू नये. आतापर्यंत प्रशासनाने ४० लाख लोकांचे आरोग्य सांभाळले. बाहेरुन येणाऱ्या आपल्या बांधवांचाही स्विकार करुन त्यांचे आणि आपले आरोग्य सांभाळूया. बाहेरुन येणाऱ्यांनीही लक्षण आरोग्य यंत्रणेला सांगून स्वत:माहिती देणे अनेक्षित आहे, असे ना. सतेज पाटील यांनी सांगितले.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER