‘बस झालं मयूर, अजून किती हृदय जिंकणार?’ पुरस्काराची अर्धी रक्कम अंध महिलेला देणार

Maharashtra Today

अंबरनाथ : वांगणी रेल्वेस्थानकात रुळावर पडलेल्या चिमुकल्याचा जीव वाचवणाऱ्या मयूर शेळकेने (Mayur Shelke) पुन्हा एकदा सगळ्यांचे हृदय जिंकले आहे. त्याने  केलेल्या धाडसाचे कौतुक करत रेल्वेने त्याला ५० हजारांचे बक्षीस जाहीर केले आहे. मात्र मयूरने पुरस्कार स्वरूपात मिळणाऱ्या रकमेतील अर्धी रक्कम अंध माता संगीता शिरसाट यांना देण्याचा निर्णय (Half of the prize money will be given to a blind woman) घेतला आहे. म्हणजेच रेल्वेकडून मिळालेल्या ५० हजारांपैकी २५ हजार रुपये मयूर हा  त्या अंध मातेला देणार आहे.

त्याच्या या दातृत्वावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गौरवोद्गार काढले आहे. ‘शाब्बास मयूर! अजून किती हृदय जिंकणार?’ अशी पोस्ट मनसेने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर शेअर केली आहे. मयूर शेळके याने काही दिवसांपूर्वी वांगणी रेल्वेस्थानकावर  जीवाची पर्वा न करता रेल्वे रुळावर पडलेल्या साहिल शिरसाट या चिमुकल्याचा जीव वाचवला होता. या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर अगदी रेल्वेमंत्र्यांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वांनीच त्याचं कौतुक केलं होतं. रेल्वेकडून त्याला ५० हजार रुपयांचं विशेष बक्षीस जाहीर करण्यात आलं. लवकरच ही रक्कम त्याला मिळणार आहे. मात्र त्यापूर्वीच त्याने बक्षिसाची अर्धी रक्कम अंध मातेला देण्याचा स्तुत्य निर्णय घेतला.

याशिवाय जावा कंपनीनेही मयूर शेळकेला बाईक भेट देण्याची घोषणा केली आहे. संगीता शिरसाट या वांगणीच्या एका चाळीत भाड्याच्या खोलीत मुलासह राहतात. रेल्वेत छोट्यामोठ्या वस्तू विकून त्या आपला उदरनिर्वाह करतात. मुलगा साहिल हाच त्यांचा एकमेव आधार असून त्याला वाचवणारा मयूर हा या अंध मातेसाठी खऱ्या अर्थानं देवदूत ठरला आहे. आपल्या लेकराला वाचवणाऱ्या रिअल हिरोचा यथोचित सन्मान करा, अशी निरपेक्ष मागणी या अंध माउलीने केली होती. निष्पाप ओठांतून निघालेली ही इच्छा देवाने ऐकलीच, मात्र त्यातील अर्धी रक्कमही आपसूक तिच्या पदरी पडली. तर देवदूताच्या रूपाने धावलेल्या मयूरने बक्षिसाची अर्धी रक्कम देण्याची घोषणा करून आपल्या दातृत्वाचं दर्शन घडवलं.

ही बातमी पण वाचा : जिगरबाज मयूर शेळकेचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक; रेल्वेकडून ५० हजारांचे बक्षीस

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button