इंग्लंडचा सुपर विजय, पहिल्यांदाच विश्वचषकाला गवसणी

England's Super Victory, First World Cup Winners

लंडन (आयसीसी वर्ल्ड कप-२०१९) : अखेरच्या षटकापर्यंत विश्वचषकाची अंतिम फेरी रंगली. पण विश्वविजेता कोण होणार, हे कुणीही सांगू शकत नव्हते. अटीतटीच्या झालेला हा सामना अखेर सुपर ओव्हरमध्ये गेला. पण सुपर ओव्हरमध्ये अखेर बाजी मारली ती इंग्लंडने. तब्बल ४४ वर्षांनंतर विश्वचषकाला गवसणी घातली आहे. सुपर ओव्हरमध्ये इंग्लंडने न्यूझीलंडवर मात केली. विशेष म्हणजे सुपर ओव्हरमध्येही टाय झाले. मात्र इंग्लंडने हा सामना जिंकला.

न्यूझीलंडच्या २४२ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचे सातत्याने फलंदाज बाद होते गेले आणि त्यांची एकेकाळी २४ षटकांत ४ बाद ८६ अशी अवस्था झाली होती. पण त्यानंतर बेन स्टोक्स आणि जोस बटलर यांनी पाचव्या विकेटसाठी शतकी भागीदारी रचली आणि इंग्लंडचे आव्हान जीवंत ठेवले. पण स्थिरस्थावर झाल्यावर मोठा फटका मारण्याच्या नादात बटलर ५९ धावांवर बाद झाला. बटलर बाद झाल्यावर ख्रिस वोक्स २ धावांवर आऊट झाला आणि इंग्लंडवरील दडपण वाढले.

ही बातमी पण वाचा : बाऊंड्री रुलबाबत विल्यम्सन होता अनभिज्ञ, मॉर्गनने करुन ठेवला होता होमवर्क

न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यचा निर्णय घेतला. पण सातव्या षटकामध्येच न्यूझीलंडला पहिला धक्का बसला. त्यानंतर हेन्री निकोल्स आणि केन विल्यमसन यांनी दुसऱ्या विकेटसाठी ७४ धावांची भागीदारी रचली. पण केन बाद झाला आणि ही भागीदारी मोडीत निघाली. केनला यावेळी ३० धावा करता आल्या. केन बाद झाल्यावर निकोल्सने आपले अर्धशतक साजरे केले. पण अर्धशतक पूर्ण झाल्यावर निकोल्स जास्त काळ खेळू शकला नाही. निकोल्सने चार चौकारांच्या जोरावर ५५ धावांची खेळी साकारली. निकोल्सनंतर टॉन लॅथमने दमदार फलंदाजी करत न्यूझीलंडचा डाव सावरला. इंग्लंडकडून लायम प्लंकेट हा यशस्वी गोलंदाज ठरला. प्लंकेटने केन, निकोल्स आणि निशाम यांना बाद करत न्यूझीलंडचे कंबरडे मोडले.

न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन बाद झाल्यावर संघाची मदार टेलरवर होती. टेलरने धावांची गती कायम राखत धावपलक हलता ठेवला होता. टेलर स्थिरस्थावर झालेला दिसत होता. टेलर आता मोठे फटके मारणार असे वाटत होते, पण त्याचवेळी पंचांच्या चुकीच्या निर्णयाने त्याचा घात केला.

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वूडने ३३ व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर टेलरला पायचीत पकडले. यावेळी त्यांनी पंचांकडे जोरदार अपील केले. त्यावेळी पंच इरॅसमस यांनी टेलरला बाद ठरवले. न्यूझीलंडकडे रीव्ह्रू नसल्याने टेलरला या निर्णयाविरोधात दाद मागता आली नाही. त्यामुळे मान खाली घालून टेलर माघारी परतला.

फलंदाजांनी चांगल्या भागीदारी न केल्याचा फटका न्यूझीलंडला अंतिम फेरीत बसला. न्यूझीलंकडून मोठ्या भागीदाऱ्या होऊ शकल्या नाहीत आणि त्यामुळेच त्यांना इंग्लंडपुढे २४२ धावांचे आव्हान ठेवता आले.