पहिल्या डावात सर्व विकेट जलद गोलंदाजांच्या, दुसऱ्या डावात सर्व विकेट फिरकी गोलंदाजांच्या

England Vs Sri lanka

श्रीलंकेविरुध्दचा दुसरा कसोटी सामना इंग्लंडने (England Vs Sri lanka) जिंकली आहे. पहिल्या डावाअखेर 37 धावांनी पिछाडीवर पडल्यावरसुध्दा यजमान श्रीलंकेला दुसऱ्या डावात अवघ्या 126 धावात बाद करुन त्यांनी विजयासाठी 164 धावांचे आवाक्यातील लक्ष्य मिळवले. किंबहुना लंकन फलंदाजांनी त्यांना हा सामना बहाल केला असे म्हटले तर चुकीचे ठरु नये.

याशिवाय आणखी एका गोष्टीसाठी हा सामना इंग्लंडने अतिशय वैशिष्ट्यपूर्ण ठरवला आहे. तो म्हणजे पहिल्या डावात श्रीलंकेचा संघ 381 धावात बाद झाला तेंव्हा सर्वच्या सर्व विकेट इंग्लंडच्या जलद गोलंदाजांनी काढल्या होत्या आणि आता दुसऱ्या डावात लंकन संघ अवघ्या 126 धावात बाद झाला तेंव्हा त्यांचे सर्वच्या सर्व गडी फिरकी गोलंदाजांनी बाद केले आहेत.

पहिल्या डावात इंग्लंडतर्फे जेम्स अँडरसनने (James Anderson) सहा, मार्क वूडने (Mark Wood) तीन आणि सॕम करनने (Sam Curran) एक गडी बाद केला होता तर दुसऱ्या डावात डॉम बेस (Dominic Base) याने चार, जॕक लीचने (Jack Leach) चार आणि जो रुट (Joe Root) याने दोन गडी बाद केले आहेत.

याप्रकारे इंग्लंडतर्फे पहिल्या डावात जलद गोलंदाज आणि दुसऱ्या डावात फिरकी गोलंदाजांनी सर्वच्या सर्व विकेट काढल्या आहेत आणि अशाप्रकारचा हा पहिलाच कसोटी सामना आहे.

याशिवाय जो रुटचे गोलंदाजीचे विश्लेषण 1.5 षटकात एकही धाव न देता दोन बळी असे अफलातून राहिले. याप्रकारे एकही धाव न देता दोन विकेट काढणारा तो पहिलाच कसोटी गोलंदाज ठरला आहे. याच्याआधी सुरेश रैना, रामनरेश सारवान व महिला क्रिकेटपटू सुसान बेनाडे यांनी फक्त एकच धाव देत दोन गडी बाद केले होते. मात्र एकहि धाव न देता दोन गडी बाद करणारा जो रुट हा पहिलाच आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER