इंग्लिश फूटबॉल संघाला करावा लागला वांशिक टोमणेबाजीचा सामना

UEFA

बल्गेरियाविरुध्दच्या सामन्यात घडला निंदाजनक प्रकार दोन वेळा थांबवावा लागला खेळ कृष्णवर्णी डिफेंडर टायरोन मिंग्ज होता लक्ष्य तत्काळ चौकशी करा- इंग्लंड फूटबॉल संघटनेची युईएफएकडे मागणी !


सोफिया (बल्गेरिया): युरो 2020 फूटबॉल स्पर्धेच्या पात्रता सामन्यात सोमवारी इंग्लंडने यजमान बल्गेरियाचा 6-0 असा धुव्वा उडवला. पण खेळापेक्षा हा सामना प्रेक्षकांच्या खराब वर्तनाने गाजला. स्थानिक प्रेक्षकांनी इंग्लंडच्या खेळाडूंबद्दल केलेल्या वांशिक शेरेबाजीने हा सामना दोन वेळा थांबवावा लागला. इंग्लंडच्या खेळाडूंना नाझी सॅल्युट, माकडेसारखे हावभाव आणि रंगभेदी टोमणेबाजीचा सामना करावा लागला.

आपल्या खेळाडूंना मिळालेल्या या तिरस्कारपूर्ण वागणूकीची युरोपियन फूटबॉल संघटना (युईएफए) ने त्वरीत चौकशी करावी अशी मागणी इंग्लिश फूटबॉल असोसिएशनने केली आहे.

ही बातमी पण वाचा :  प्रथम श्रेणी क्रिकेटपटूंना प्राधान्य, सौरव गांगुलीचा अजेंडा

या दणदणीत विजयासह इंग्लंडचा संघ युरो 2020 साठी पात्र ठरण्याच्या जवळ पोहोचला आहे.या सामन्यात इंग्लंडचा संघ 2-0 असा आघाडीवर असताना पहिल्यांदा 28 व्या मिनिटाला खेळ थांबला.त्यावेळी प्रेक्षकांना इशाराही देण्यात आला की त्यांच्याकडून अशीच तिरस्कारपूर्ण शेरेबाजी सुरू राहिली तर खेळ येथेच थांबविण्यात येईल पण गॅरेथ साऊथबेटच्या संघाने सामना पूर्ण करायची तयारी दर्शविल्यावर खेळ पुढे सुरू झाला. खेळ पुन्हा सुरू झाल्यावर इंग्लंडने रॉस बॉर्कलीच्या दुसऱ्या गोलआधारे आघाडी 3-0 अशी वाढवली पण त्यानंतर रेफरी इव्हान बेबेक यांना नाईलाजाने पुन्हा खेळ 43 व्या मिनिटाला थांबवावा लागला. बेबेक यांनी दोन्ही संघाचे खेळाडू व अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर पुन्हा खेळ झाल्यावर रहिम स्टर्लिंगने खेळाच्या दोन्ही सत्रात केलेले गोल आणि हॅरी केनच्या गोलाआधारे इंग्लंडने 6-0 असा विजय साजरा केला.

या सामन्यानंतर इंग्लंड संघाचे व्यवस्थापक गॅरेथ साऊथगेट म्हणाले की, परिस्थिती खेळण्यासारखी नव्हती. मला वाटते आम्ही सामना जिंकून दोन गोष्टी केल्या. एक तर आम्ही खेळ सोडला नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही परिस्थितीबद्दल प्रत्येकाची जागरूकता वाढवली. काही लोकांना दोन वेळा खेळ थांबणेही पुरेसे नव्हते पण आम्ही संघटीत राहिल्याने त्यांचे इरादे सफल झाले नाहीत.

इंग्लंडतर्फे पदार्पण करणारा डिफेंडर टायरोन मिंग्ज हा टोमणेबाजांचे लक्ष्य होता. त्याच्यामते खेळ थांबल्यामुळेच सामन्याच्या दुसऱ्या सत्रात टोमणेबाजीचे प्रमाण कमी झाले. वेळीच योग्य पाउल उचलल्याने बरे झाले. सामना पूर्ण खेळायचा निर्णय आम्ही जो निर्णय घेतला माझ्यामते तो योग्यच होता. आणखी काही विपरित घडले असते तर आम्ही योग्य ती पाऊले उचलली असती असे मिंग्ज म्हणाला.

गेल्या मार्चमधील सामन्यातही माँटेनिग्रो येथे इंग्लंडच्या खेळाडूंना अशाच शेरेबाजीचा सामना करावा लागला होता. त्यानंतर साऊथगेट यांनी खेळाडूंना युईएफएच्या तीन टप्प्यांच्या शिष्टाचाराचा अवलंब करत वांशिक वादाची तक्रार करण्यासाठी तयार केलेले होते. अशा तक्रारीनंतर सामना अर्धवट सोडून देता येतो.

माँटेनिग्रोविरुध्दच्या सामन्यात वांशिक टोमणेबाजी झाल्यावर माँटेनिग्रोला 20 हजार युरोंचा दंड करण्यात आला होता आणि त्यांच्या पुढच्या दोन सामन्यांना प्रेक्षकांना प्रवेश देण्यात आला नव्हता.

सोफिया शहरातील व्हॅसील लेव्हस्की स्टेडियममध्ये गेल्या जूनमध्ये कोसोव्हो आणि झेक गणराज्याच्या सामन्यावेळीसुध्दा अशा वांशिक विवादाच्या घटना घडल्या होत्या. त्याची दखल घेऊन इंग्लंडविरुध्दच्या या सामन्यासाठी प्रेक्षागारातील पाच हजार खूर्च्यांचा एक भाग बंदच ठेवण्यात आला होता.

अधिकाऱ्यांनी प्रत्येक तक्रारीची तत्काळ दखल घेतली. आम्ही प्रत्येक आक्षेपार्ह बाब लगेच त्यांच्या लक्षात आणून दिली. सामन्याच्या रेफरी व अधिकाऱ्यांसोबत आमचा सतत संवाद सुरू होता असे साऊथगेट यांनी सांगितले.

युईएफएच्या शिष्टाचारानुसार इंग्लंडच्या संघातील कृष्णवर्णी खेळाडूंकडे रोखून केलेल्या शेरेबाजी व माकडांसारख्या हावभावाबाबत (मंकी चॅट)खेळ तात्पुरता थांबविण्यात आला आणि प्रेक्षकांना ध्वनीक्षेपकावरुन इशारा देण्यात आला की त्यांनी शांतता राखली नाही आणि शेरेबाजी थांबवली नाही तर खेळ होणार नाही. मात्र या इशाऱ्याचाही परिणाम न झाल्याने दुसऱ्यांदा खेळ थांबवावा लागला. काही दंगेखोर बल्गेरियन प्रेक्षकांना स्टेडियमबाहेर काढण्यात आले. या व्यत्ययांमुळे सामना सहा मिनीटे लांबला.

हा सारा प्रकार पहायला इंग्लंड फूटबॉल असोसिऐशनचे अध्यक्ष ग्रेग क्लार्क उपस्थित होते. ते म्हणाले की, फूटबॉलच्या इतिहासातील ही एक खराब रात्र होती. निंदाजनक वांशिक घोषणा ऐकायला मिळाल्या. साधारण 50 जणांचा एक गट काळ्या वेशामध्ये फासिस्ट सॅल्युटसारखे राजकीय हावभाव करताना दिसला. मी स्वतः काही खेळाडू व कर्मचाऱ्यांशी चर्चा केली कारण आमच्या संघातच नाही तर स्टाफमध्येही वेगवेगळ्या वंशाचे लोकं आहेत. ते साहजिकच चिंतीत दिसले,नाराज दिसले. युईएफएने या सर्व प्रकाराची तत्काळ सखोल चौकशी करावी अशी मागणी क्लार्क यांनी केली आहे.