इग्लंडच्या गोलंदाजांचा डंका, ‘नो एक्स्ट्राज, प्लीज’

England

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अलीकडच्या काळात तिसऱ्या पंचाकडे नो बॉलचा निर्णय सोपवल्यापासून नो बाॕलच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे अवांतर धावांची (Extra Runs) संख्यासुध्दा वाढली आहे. तरीसुध्दा इंग्लंडच्या गोलंदाजांनी कमाल केली. भारताविरुध्द चैन्नईच्या (Chennai) दुसऱ्या कसोटीत भारताने केलेल्या 329 धावांत त्यांनी एकसुध्दा अवांतर धाव दिली नाही. नो बॉल नाही, वाईड नाही, बाईज नाही की लेग बाईज नाही. अशाप्रकारे इंग्लंडचे गोलंदाज, स्ट्युअर्ट ब्रॉड (Stuart Broad) , आॕली स्टोन, जॕक लीच, बेन स्टोक्स, मोईन अली व जो रुट यांनी अतिशय शिस्तबद्ध गोलंदाजी करुन 95.5 षटकांत एकही अवांतर धाव दिली नाही.

याप्रकारे सर्वाधिक धावसंख्येत एकही अवांतर धाव न देण्याचा विश्वविक्रम आपल्या नावावर लावला आहे. याआधीचा विक्रम तब्बल 65 वर्षांपासून भारताच्या नावावर होता. जानेवारी 1955 मध्ये पाकिस्तानने लाहोर कसोटीत 328 धावा केल्या होत्या त्यावेळी भारतीय गोलंदाजांनी एकसुध्दा अवांतर धाव दिली नव्हती. विशेष म्हणजे त्यावेळी भारतीय गोलंदाजांनी तब्बल 187.5 षटके गोलंदाजी केली होती तर इंग्लंडच्या गोलंदाजांनी 1892 च्या मेलबोर्न कसोटीत 191.5 षटकांत एकही अवांतर धाव दिली नव्हती. सर्वाधिक षटके गोलंदाजी करुनही एकसुध्दा अवांतर धाव न देण्याचा हा विश्वविक्रम आहे.

त्याआधी 1930-31 मध्ये दक्षिण आफ्रिकेने डरबन कसोटीत केलेल्या 252 धावांमध्ये इंग्लंडच्या गोलंदाजांनी एकही अवांतर धाव दिली नव्हती.

अवांतर धावेशिवाय सर्वात मोठ्या धावसंख्या

धावा (षटके)—- संघ — गोलंदाजी— वर्ष
329 (95.5) — भारत — इंग्लंड — 2021
328 (187.5)- पाक — भारत — 1955
252 (130.4)- द.आ.— इंग्लंड — 1931
247 (94.4) — द.आ. — इंग्लंड —1960
236 (191.5)- आॕस्ट्रे. — इंग्लंड — 1892
234 (59.2) — बांगला– न्यूझी.—-2019

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER