इंग्लंडचा ११९ धावांनी न्यूझीलंडवर विजय; इंग्लंड उपांत्य फेरीत दाखल

क्रिकेट विश्वचषक 2019 / लंडन : आयसीसी वर्ल्ड कप-२०१९ : न्यूझीलंडवर ११९ धावांनी दणदणीत विजय मिळवत इंग्लंडने उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे. इंग्लंडने न्यूझीलंडपुढे विजयासाठी ३०६ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा डाव १८६ धावांवर आटोपला आणि इंग्लंडने विजयासह उपांत्य फेरी गाठली.

प्रथम फलंदाजी करीत इंग्लंडच्या सलामीवीर जॉनी बेअरस्टोवने न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात शतक झळकावत चांगला पाया रचला. पण यावर साजेसा कळस मात्र इंग्लंडच्या फलंदाजांना चढवता आला नाही. बेअरस्टोव बाद झाल्यावर इंग्लंडचे फलंदाज एकामागून एक धारातीर्थी पडत गेले आणि त्यांना न्यूझीलंडपुढे ३०६ धावांचे आव्हान ठेवता आले. बेअरस्टोव खेळत असताना इंग्लंड चारशे धावांच्या जवळपास जाईल, असे वाटत होते.

ही बातमी पण वाचा : टॉस हारला तरी पाकिस्तान होणार विश्वचषकाबाहेर!

इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय योग्य असल्याचे जॉनी बेअरस्टोव आणि जेसन रॉय यांनी दाखवून दिले. या दोघांनी इंग्लंडसाठी १२३ धावांची सलामी दिली. रॉयच्या रुपात इंग्लंडला पहिला धक्का बसला. रॉयने आठ चौकारांच्या जोरावर ६१ धावांची खेळी साकारली.

रॉय बाद झाल्यावरही बेअरस्टोवने दमदार फटकेबाजी सुरुच ठेवत या सामन्यातही शतक झळकावले. भारताविरुद्धच्या गेल्या सामन्यातही बेअरस्टोवने शतक झळकावले होते. बेअरस्टोवचे हे सलग दुसरे शतक ठरले. या सामन्यात बेअरस्टोवने १५ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर १०६ धावांची खेळी साकारली. शतक झळकावल्यावर मात्र बेअरस्टोवला जास्त धावा करता आल्या नाही. बेअरस्टोव बाद झाल्यावर इंग्लंडचा डाव गडगडायला सुरुवात झाली. बेअरस्टोव बाद झाला तेव्हा इंग्लंडची ३१.४ षटकांत ३ बाद २०६ अशी स्थिती होती. त्यानंतर इंग्लंडच्या फलंदाजांनी हाराकिरी पत्करल्याचे पाहायला मिळाले. या पराभवानंतर न्यूझीलंडच्या संघर्ष संपुष्ठात आला आहे.

ही बातमी पण वाचा : सिकंदर बख्त यांची नवीन शक्कल; म्हणे मुस्लीम असल्याने शमीची कामगिरी अव्वल !