ऊर्जा : स्वकष्टाची ! दुर्दम्य इच्छाशक्तीची !

Will power

आपल्या दररोजच्या जीवनामध्ये आजूबाजूला बघितलं तर बरेचदा अनेक लोक असे असतात की, त्यांना सारखे कोणी तरी ढकलायची गरज लागते. त्यांची स्वतःहून एखादी गोष्ट करण्याची क्षमता जवळजवळ नसते. मग कितीही मोटिवेशनल बुक्स वाचलीत तरीही त्यांना तात्पुरती प्रेरणा मिळते. अर्थात ज्या लोकांना नैराश्याचा, उदासीनतेचा आजार आहे किंवा एखादी परिस्थिती ते स्वीकारू शकत नाहीत आणि बदलही करू शकत नाहीत. म्हणजे ज्यांना त्या त्या परिस्थितीशी समायोजन किंवा ॲडजस्टमेंट करता येत नाही, असे काही लोक किंवा काही लोकांना स्वतःचे असे काही तरी मिळवायचे आहे; पण मिळवू शकत नाहीत. अशा अनेक प्रकारच्या लोकांना प्रेरणा बाहेरून लागते. त्यांच्याकडे स्वयंप्रेरणेचा अभाव असतो. असे काही अपवाद वगळता, तरीही बरेच लोक कोणी तरी ढकलल्याशिवाय म्हणजेच बाह्यप्रेरणेशिवाय काम करत नाहीत.

पण दुसऱ्या बाजूने काही लोक असेही दिसतात, ज्यांना कुठलीच परिस्थिती अनुरूप नाही. कुठल्याच गोष्टीचे पाठबळ त्यांच्या पाठीशी नाही. समोर फक्त काळोख असतो आणि अशा परिस्थितीत हे लोक जणू स्वयंप्रकाशित वाटाडे म्हणून काम पाहतात. वास्तविकपणे परिस्थिती त्यांना प्रकाशवाट दाखवते, मात्र ती तितकीशी सहजसोपीही नसते. मग कुठल्या गोष्टी त्यांना मदत करत असतील ? तर ती म्हणजे त्यांची दुर्दम्य इच्छाशक्ती ! आणि स्वकष्टाने आयुष्य उभारले जात असताना त्यातून मिळणारी ऊर्जा ! अशी अनेक उदाहरणे आपण बघतो, वाचतो, ऐकतो.

आता हेच बघा ना ! ही कथा आहे , जीआन ह्यूएंग ग्रुप या बलाढ्य कंपनीची संस्थापक आणि संचालक एनी ग्रेपची. “बिकट परिस्थितीत वाढलेली माझ्यासारखी मुले जात्याच कष्टाळू असतात. आम्हाला लढवय्ये बनावेच लागते” असे ती म्हणते. जगभरातील एकूण रबर उत्पादनाच्या ७२ टक्के रबराचे उत्पादन मलेशियात होते. त्यामुळे रबर टॅपिंग उद्योग मोठ्या प्रमाणात चालतो. आज जरी आर्टिफिशियल रबर टॅपिंग सिस्टीम वापरण्यात येत असली, तरीही ३०-३५ वर्षांपूर्वी मलेशियातील अशिक्षित किंवा अल्पशिक्षित लोकांचे हेच रोजगाराचे प्रमुख साधन होते. अशाच एका रबर टॅपिंग करणाऱ्या कुटुंबातील एनी ग्रेप ही घरातील सगळ्यात मोठी मुलगी. पाच वर्षांची  असतानाच एका अपघातामध्ये तिच्या वडिलांचे निधन झाले आणि सहा मुलांची जबाबदारी आईवर येऊन पडली. तिला प्रपंच चालविणे अवघड झाले.

म्हणून आई सकाळपासून रात्रीपर्यंत दोन ठिकाणी मजुरीला जाऊ लागली. दुपारी येऊन स्वयंपाक करायला लागे. आपोआपच सगळ्यात मोठी असल्यामुळे सकाळ-संध्याकाळच्या स्वयंपाकाची आणि भावंडांना सांभाळण्याची जबाबदारी एनीवर पडली. आर्थिक चणचण असल्यामुळे शाळा सोडावी लागली. १४ वर्षांची असताना एका दूरच्या नात्यातल्या काकांकडे शिक्षणासाठी गेली; पण जेमतेम शाळेतली तीन वर्षे पूर्ण झाली नव्हती तोच भावंडांकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे दोन भाऊ अगदी वाया जाण्याच्या मार्गावर आहे या आईच्या निरोपाने तिने परत आपले घर गाठले.

मात्र शिक्षण सोडले नाही. ‘O’ लेव्हलचे शिक्षण पूर्ण केले. नंतर मात्र तिने सिंगापूरमध्ये नोकरी करून घरच्यांना हातभार लावला आणि कोर्सेसही केले. तिला नोकरीही सहजतेने मिळाली. स्वतःसाठी थोडे पैसे ठेवून उरलेले ती कुटुंबीयांना पाठवायला लागली. हळूहळू पगार वाढला, छोटेसे घर ही घेतले, एका सहकारी मित्राने आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी पीआर म्हणून तिला बोलावले आणि पगारही वाढवला. तिने तो प्रस्ताव स्वीकारला. सगळे काही सुरळीत सुरू असतानाच अचानक एक दिवस त्याने व्यवसाय सोडून परत गावी जायचे ठरवले. परंतु पोलीस हेडकॉर्टर बेसमेंट कार पार्किंगचे कॉन्ट्रॅक्ट साईन केले होते. ते काम जर पूर्ण केले नसते तर तिच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकली असती. अशा प्रकारे आपण विश्वसनीयता गमावून बसू असे तिला समजले. अशा वेळी खूप वाईट वाटत होतं.

पण तिची धडपडी वृत्ती हार मानायला तयार नव्हती. बरोबर असलेल्या काही लोकांसह तिने नवीन नावाने कंपनी पंजीकृत केली. आणि काम पूर्णत्वास नेण्याचा ध्यास घेतला .प्रत्यक्ष साईटवर कसे काम चालते याबाबत ती अनभिज्ञ होती. मजूर आणि इतर मंडळी खिल्ली उडवत होती . निराशाजनक परिस्थिती होती. परंतु तरीही प्रोजेक्ट पूर्ण केले. हे करत असतानाच तिचा शालेय जीवनातील वर्गमित्र तोही इंजिनीअर झालेला तिच्या गावी आला आणि त्याने तिच्या व्यवसायात तिला बरीच मदत केली .पुढे ते विवाहबद्ध झाले.हे सगळं खूप सहजतेने झालेले नाही, तर बहुतांश पुरुषांचा वरचष्मा असलेल्या व्यवसायात तग धरून राहणे एक स्त्री म्हणून पण कठीण होते. वाळू तुटवडा, आर्थिक तोटा यासारखी संकट समोर होती. हलाखीच्या परिस्थितीतील बालपण आणि बिकट परिस्थिती, नकळत्या वयात अंगावर पडलेली जबाबदारी, अपुरे शिक्षण सगळ्यांना तोंड देत तिचा एक सब कॉन्ट्रॅक्ट कंपनीपासून सुरू झालेला प्रवास आज सिंगापूरमधील पहिल्या तीन मुख्य कॉन्ट्रॅक्ट कंपन्यांपैकी एकपर्यंत आला आहे.

ह्या तिच्या प्रवासात कोणीही तिला प्रेरणा देणारे नव्हते की तिने कुठलीच प्रेरणादायक पुस्तके वाचलेली नव्हती. फक्त दुर्दम्य इच्छाशक्ती हेच त्याचे उत्तर होते. बिकट परिस्थिती तीच कशी शिक्षण देते हेच सांगणारे आणखीन एक उदाहरण आहे . ते म्हणजे आमच्या धृपदाचे! धृपदा आमच्या कॉलनीमध्ये धुण्याभांड्याचे काम करते. ती आणि तिचा नवरा! चांगला संसार सुरू होता, लागोपाठ दोन मुली झाल्या. नवऱ्याला मुलगा पाहिजे होता. त्यापायी नवरा बिथरला,मारझोड करू लागला. तिने मोठ्या मनाने नवऱ्याचे दुसरे लग्न लावून दिले , सवतीबरोबरही जमवून घेतले. पण नवऱ्याची मारपीट असह्य होऊन दोन मुलींना घेऊन एक दिवस घर सोडले. बऱ्याच दिवसांपासून ज्यांच्याकडे काम करत होती ,त्या आजींनी घरात घेतले. प्रचंड मार बसलेला होता. दोनचार दिवसांत परत धैर्याने उभी राहिली. एक रूम बघितली. मुलींसह राहू लागली. दहा ठिकाणची काम करू लागली. लोकांसोबत प्रेमाने राहून छोटी-मोठी कामं करून देऊ लागली.

गाठीला येणारे पैसे वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवू लागली. कुठे आरडी काढ , कुठे खाते उघड, तर कुठे भिशी टाक. हळूहळू मुली मोठ्या होऊ लागल्या. दोघीही हुशार! एकीने बीसीएस केले. तिला आता मुलींसह राहायला चांगली जागा हवी होती, भरवशाची! परत त्याच आजींनी आउट हाउसमधली जागा दिली. तिला आता मुलींच्या लग्नाची काळजी लागली होती. शिक्षणात ती कुठे पैसा कमी पडू देत नव्हती, की तिने मुलींना कामाला पण लावले नाही. परंतु आता एवढ्या शिकलेल्या मुलींना आपल्याकडची एवढी शिकलेली मुले नसणार कसं व्हायचं ? ही चिंता होती. पण ती स्वामी समर्थांची भक्त ! श्रद्धेने तिला तारले. लॉकडाऊनमध्ये पुण्याच्या एका स्थळाशी मुलीचे लग्न लावून टाकले ,एकदम कमी खर्चात ! मुलीलाही पुण्यातच नोकरी होती. आता तिला फक्त एका मुलीचे लग्न करायचे आहे, त्याचीही तयारी तिने करून ठेवली आहे.

काल शेजारच्या वहिनींनी पूरग्रस्तांसाठी निधी गोळा करणाऱ्यांना मदत केली तेव्हा ती म्हणत होती, “वैनी, त्यांना तुम्ही मदत करता चांगलंच हाय. पण आमी पूर, दुष्काळग्रस्त नाही .पण कष्टग्रस्त हायेच की ! आम्हाला पैसा लागला तर तुम्ही सगळे परतफेडीच्या बोलानं देता. पन या लोकांची तुम्हास्नी माहिती बी नाय. त्यांना तुम्ही सढळ हाताने मदत करता .पन आम्ही तुम्ही घरात नसला तरी इश्वासानं काम करून जातो तर पैशे लगेच काटायला लागता. पन तुमच्या कृपेने आजपर्यंत कुनाकडून एक पैसाबी उसना घेतला न्हाय. हाय म्हना तुमच्या आजीसारके लोकं, त्यांच्या प्रेमाच्या आधारानं आम्ही जगतूय बगा!

मी ऐकत होते. खरंच होतं तिचं ! हीच तिची शक्ती, जगण्या प्रतीची ऊर्जा ,कुठून मिळत होती तिला ? स्वकष्टाची, मेहनतीची ऊर्जा होती ती ! फ्रेंड्स ! एखादे कार्य पूर्णत्वास नेण्यासाठी, ध्येयपूर्तीसाठी, यशस्वी जीवनासाठी हवी असते केवळ दुर्दम्य इच्छाशक्ती आणि कष्टाची तयारी . तीच  आपल्याला प्रचंड ऊर्जा देऊन जाते. आणि मग बाहेरून कोणी लोटायची गरज राहात नाही.

मानसी गिरीश फडके
(समुपदेशक व सायकोथेरपिस्ट)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER