शेतकऱ्यांचे आंदोलन मिटवणे हाच राजधर्म – सोनिया गांधी

Sonia Gandhi

दिल्ली : केंद्राचे शेतीबाबतचे तीन कायदे परत घ्या, या मागणीसाठी ३९ दिवसांपासून शेतकरी दिल्लीच्या हाडं फोडणाऱ्या थंडीत लढा देत आहेत. अन्नदात्यांची ही दयनीय स्थिती पाहून देशातील जनतेसोबत मीदेखील अत्यंत व्यथित आहे, असे काँग्रेसच्या (Congress) अध्यक्ष सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी म्हटले आहे.

याबाबत प्रकाशित केलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, या आंदोलनाची सरकारने उपेक्षा केल्याने आतापर्यंत ५० पेक्षा जास्त शेतकऱ्यांचा जीव गेला आहे. काहींनी तर आत्महत्या केली आहे; पण मोदी सरकारचे ह्रदय द्रवले नाही. पंतप्रधान किंवा कोणत्याही मंत्र्याच्या तोंडून शेतकऱ्यांची सांत्वना करणारा एक शब्दही निघाला नाही. मी सर्व दिवंगत शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करून, परमेश्वर त्यांच्या कुटुंबाला हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो, अशी प्रार्थना करते.

मोदी सरकारवर (Modi Government) टीका करताना त्या म्हणाल्या, स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा देशात असे सरकार आले आहे की, ज्याला जनता तर सोडा; देशाचे पोट भरणाऱ्या अन्नदात्याचे दुःख आणि संघर्ष दिसत नाही. असे वाटते की, मूठभर उद्योगपतींचा नफा निश्चित करणे हेच या सरकारचे धोरण आहे.

सरकारला इशारा देताना सोनिया गांधी म्हणाल्यात की, जनभावनांची उपेक्षा करणारी सरकारे आणि त्यांचे नेते जास्त काळ सत्तेत राहात नाहीत. शेतकऱ्यांच्या आंदोलनाने सिद्ध केले आहे की, या सरकारच्या ‘थकवा आणि पळवा’ या व्यूहरचनेपुढे शेतकरी-मजूर झुकणार नाहीत.

अजूनही वेळ गेलेली नाही. मोदी सरकारने अहंकार सोडून विनाअट, तत्काळ तीनही काळे शेतकरी कायदे रद्द करावेत. थंडी-पावसात जीव धोक्यात टाकून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचे आंदोलन मिटवावे; हाच राजधर्म आहे आणि हीच आंदोलनात प्राण गमावणाऱ्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली आहे, असे त्या म्हणाल्यात.

मोदी सरकारने हे लक्षात घ्यावे की, जनता आणि शेतकरी-मजूर यांच्या हितांचे रक्षण करणे हीच खरी लोकशाही आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER