अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विश्वकोशाची माहिती युवा पिढीपर्यंत पोहोचविण्याचे विनोद तावडे यांचे आवाहन

मराठी विश्वकोश ज्ञानमंडळ संकेतस्थळाचे आणि मराठी विश्वकोश या मोबाईल ॲपचे लोकार्पण

Vinod Tawade

मुंबई :- मराठी विश्वकोष निर्मिती मंडळाचे काम अतिशय व्यापक आहे, विश्वकोशाचे १ ते २० खंड आणि कुमार विश्वकोश आदी माहिती डिजिटल स्वरुपात उपलब्ध होत आहे. अतिशय दुर्मिळ आणि एकत्रित माहिती शालेय, महाविद्यालयीन स्तरावरील विद्यार्थी व युवकांना मिळणेही आवश्यक असून आता ही मराठी विश्वकोशाची सर्व माहिती वेबसाईट आणि मोबाईल ॲपचे पुढे जाऊन नवीन अद्ययावत आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून युवा पिढीपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन मराठी भाषामंत्री विनोद तावडे यांनी आज केले.

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ यांनी अद्ययावत केलेल्या मराठी विश्वकोश ज्ञानमंडळ संकेतस्थळाचे आणि मराठी विश्वकोश या मोबाईल ॲपचे लोकार्पण आज श्री. तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. बोरीवली येथील अटल स्मृती उद्यान येथे आयोजित कार्यक्रमप्रसंगी महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष दिलीप करंबळेकर, सदस्य डॉ.बाळ फोंडके यांच्यासह विश्वकोश मंडळाचे सदस्य, ज्ञानमंडळाचे सदस्य तज्ज्ञ, अभ्यासक आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना श्री. तावडे म्हणाले, मराठी विश्वकोश मंडळाने १ ते २० खंडांची निर्मिती केल्यानंतर आता डिजिटल स्वरुपात पाऊल ठेवले आहे. मराठी भाषा विभागाने मराठी भाषा अधिक समृद्ध करण्याच्या दृष्टीने तंत्रज्ञान व मराठी यांची सांगड घालण्याचे अनेक उपक्रम केले आहेत. आगामी काळात मराठी विश्वकोश हा अधिकाधिक तरुणांपर्यंत पोहचविण्याचे खरे आव्हान आहे, त्यादृष्टीने वेबसाईट आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून डिजिटल मिडियाच्या क्षेत्रात आणखी एक पाऊल टाकले असून, याचा उपयोग आपल्या सर्वांना होणार आहे.

मराठी विश्वकोश च्या माध्यमातून विविध प्रकारच्या दर्जेदार माहितीचा खजिना अभ्यासक, संशोधकांना उपलब्ध होणार आहे. मराठी विश्वकोशमधील माहिती शालेय व महाविद्यालयीन स्तरावरील विद्यार्थ्यांना मिळणे गरजेचे आहे. विश्वकोशाच्या माध्यमातून उपलब्ध होणारी माहिती विद्यार्थी, अभ्यासकांच्या संदर्भासाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे. त्यादृष्टीने मराठी विश्वकोश मंडळाला अधिक बळकटी देण्यासाठी शासन कटिबध्द आहे असेही श्री. तावडे यांनी सांगितले.

याप्रसंगी श्री.करंबळेकर, डॉ.फोंडके यांची भाषणे झाली. विश्वकोशामधील नोंदी अद्ययावत करण्यासाठी ज्या मान्यवरांनी सहकार्य केले अशा मान्यवरांचा यावेळी श्री.तावडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये लोकसाहित्य आणि लोकसंस्कृतीचे समन्वयक डॉ.प्रकाश खांडगे, स्थापत्य अभियांत्रिकीचे समन्वयक डॉ.सुहासिनी माढेकर, प्राणिविज्ञान समन्वयक डॉ.मोहन भद्वण्णा, अभिजात भाषा आणि साहित्य चे समन्वयक डॉ.सुनिला गोंधळेकर, संगीतचे समन्वयक डॉ.सुधीर पोटे, शिक्षणशास्त्र समन्वयक डॉ.कविता साळुंके, अर्थशास्त्र ज्ञानमंडळचे विषयपालक डॉ. नीरज हातेकर, डॉ.संतोष दास्ताने, डॉ.सुषमा देव, डॉ.शरद चाफेकर, डॉ.कला आचार्य, डॉ.वसंत वाघ, डॉ.अ.पां. देशपांडे, मेजर जनरल शशिकांत पित्रे, डॉ.अरुण भोसले, डॉ.हेमचंद्र प्रधान, डॉ.बाळ फोंडके आदी मान्यवरांचा समावेश होता.