शेततळ्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करा – डॉ. रणजीत पाटील

Ranjit Patil

अकोला : मागेल त्याला शेततळे योजना हा शासनाचा महत्त्वाकांक्षी उपक्रम असून या योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ मिळण्यासाठी शेततळ्याचे महत्त्व शेतकऱ्यांना पटवून द्यावे. त्यासाठी सदर योजनेची मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी. सूलभ तथा सहज पद्धतीने शेतकऱ्यांना शेततळे मिळण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करावे, अशी सूचना पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केली.

जिल्ह्यातील महत्त्वाच्या प्रकल्पांचे काम वेळेत मार्गी लागण्यासाठी त्यातील प्रशासकीय अडचणी दूर कराव्यात. त्याकरिता आवश्यक ते सहकार्य केले जाईल. रस्त्यांचे निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या कंत्राटदारांना ब्लॅकलिस्ट करावे, अशा सूचनाही पालकमंत्री यांनी दिल्या.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर येथील विधान भवनात दि. 12 डिसेंबर 2017 रोजी अकोला जिल्ह्यातील विविध समस्या संदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर पूर्वतयारी म्हणून जिल्ह्यातील समस्यांचा आढावा घेण्यासाठी आज पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली लोकशाही सभागृहात विभागप्रमुखांची बैठक संपन्न झाली. त्यावेळी पालकमंत्री बोलत होते.

विभागीय आयुक्त पीयुष सिंह, जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रामामूर्ती, पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, अप्पर जिल्हाधिकारी नरेंद्र टापरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष पवार, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते आदींसह सर्व विभागप्रमुख यावेळी उपस्थित होते.