एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्माही अडकले शिवबंधनात

Pradeep Sharma

मुंबई : एन्काऊंटर स्पेशालिस्ट अशी ओळख असलेले पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांनाही राजकारणाचा मोह आवरता आला नाही आणि त्यांनी अखेर शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी प्रदीप शर्मांना शिवबंधनात अडकविले. प्रदीप शर्मा यांना नालासोपारा किंवा अंधेरी मतदारसंघातून विधानसभेचे तिकीट दिले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांना शह देण्यासाठी शर्मा यांच्या रुपात शिवसेना सज्ज झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

सिने कलावंत, माजी सनदी अधिकारी, पोलीस अधिकारी यांना राजकारणाची मोठी आवड असते. नोकरीवर असताना याच राजकारण्यांच्या इशाऱ्यावर त्यांना नाचावे लागते यामुळे राजकारणात जाण्याची पोलीस अधिकाऱ्यांची मनातून इच्छा असते.

दरम्यान, एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांचा शिवसेनेत प्रवेश निश्चित होताच विरारमध्ये शिवसैनिकांनी घोषणा देत जल्लोष केला आहे. विरार पूर्व पनवेल पाडा तलावा शेजारील मातोश्री संपर्क कार्यालयाजवळ शिवसैनिकांनी जल्लोष केला. सायंकाळी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शर्मा अधिकृत शिवबंधन बांधून शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला.

वसई विरार भागात ठाकूर कुटुंबाचे राजकीय वर्चस्व आहे. ते मोडून काढण्यासाठी शिवसेना प्रदीप शर्मा यांच्या नेम आणि फेमचा वापर करू शकते. नालासोपारामधून क्षितीज ठाकूर रिंगणात उतरले तर त्यांना काटे की टक्कर देण्यासाठी प्रदीप शर्मा तुल्यबळ उमेदवार ठरू शकतात. कारण या मतदारसंघात उत्तर भारतीयांची मते निर्णायक ठरणार आहेत. मूळचे उत्तर भारतीय असणारे प्रदीप शर्मा शिवसेनेसाठी मतांची मोठी बिदागी जमवू शकतात.

प्रदीप शर्मा यांचा अल्प परिचय
आतापर्यंत शर्मांच्या बंदुकीतून निघालेल्या गोळ्यांनी तब्बल ३१२ गुन्हेगारांना यमसदनी धाडले आहे. ज्यात लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्यांपासून, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या डी गँगच्या हस्तकांचा समावेश आहे.

प्रदीप शर्मा यांचा जन्म जरी उत्तर प्रदेशात झाला असला तरी त्यांचे शिक्षण महाराष्ट्रातल्या धुळ्यात पूर्ण झाले आहे. एमएससीपर्यंत शिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रदीप शर्मा १९८३ मध्ये पोलीस सेवेत रुजू झाले. मुंबईतल्या माहिम पोलीस ठाण्यात उपनिरीक्षक पदावर नियुक्त झालेल्या प्रदीप शर्मांनी अल्पावधीतच वरिष्ठ पोलीस निरीक्षकापर्यंत बढती मिळवली.

शेकडो गुन्हेगारांचा कर्दनकाळ ठरलेले प्रदीप शर्मा चकमक फेम अधिकारी म्हणून नावारुपाला आले. कुख्यात गुंडांशी संबंध असल्याच्या संशयावरून प्रदीप शर्मांना ऑगस्ट २००८ मध्ये निलंबीत करण्यात आले. मात्र सबळ पुराव्याअभावी प्रदीप शर्मांना क्लीनचिट मिळाल्यानंतर त्यांनी पुन्हा अंगावर खाकी चढवली. २०१७ मध्ये पोलीस सेवेत पुन्हा रूजू झाल्यानंतर प्रदीप शर्मा यांनी दाऊद इब्राहिमचा भाऊ इकबाल कासकरला अटक केली आणि त्यांच्यातला धडाकेबाज अधिकारी जिवंत असल्याची जाणीव करून दिली.

ऐन विधानसभेच्या तोंडावर प्रदीप शर्मांनी तडकाफडकी राजीनामा दिला. त्यांना राजकारणाची आवड असल्याने पोलीस खात्याचा राजीनामा देत शिवबंधन बांधत त्यांनी निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे.