एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांच्या शिवसेना प्रवेशापूर्वीच कार्यकर्त्यांकडून प्रचार सुरु

Pradeep Sharma

विरार : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चा जोरावर आहेत. मात्र अधिकृत पक्षप्रवेशापूर्वीच शिवसेना कार्यकर्त्यांनी त्यांच्या प्रचाराचा नारळ फोडला आहे . नालासोपारा विधानासभा मतदारसंघातून प्रदीप शर्मा शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवणार, हे जवळपास निश्चित मानलं जात आहे.

मुंबईत ठिकठकाणी आता दहीहंडी उत्सव, गणपती उत्सव यांची तयारी सध्या जोरात सुरु आहे. यानिमित्ताने नालासोपारा मतदारसंघातही शिवसेना कार्यकर्त्यांनीही या सर्व उत्सवांची धामधूम सुरु केली आहे . या ठिकाणी भावी आमदार प्रदीप शर्मा असे बॅनर लागले आहेत. तसेच शर्मा यांचे फोटो असलेल्या 20 हजारांहून अधिक टीशर्ट्सचंही वाटप करण्यात येत आहे. विशेष म्हणजे कोकणवासियांना गणपती दर्शनासाठी 100 रुपयात बसेस करुन देण्यात येत आहेत. त्यावरही प्रदीप शर्मा यांना सौजन्य देण्यात आलं आहे. त्यामुळे शर्मांच्या पक्षप्रवेशापूर्वीच प्रचार यंत्रणा सज्ज झाली आहे.

ही बातमी पण वाचा : स्वातंत्र्यवीर सावरकरांना न मानणाऱ्यांना एकदा चौकात फटकावले पाहिजे-उद्धव ठाकरेंचा संताप

आगामी विधानसभा निवडणुकीत प्रदीप शर्मा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे बोलले जाते . शर्मा हे शिवसेनेत जाणार की भाजपमध्ये जातील याबाबत तर्कवितर्क सुरु होते . मात्र आता शर्मा हे शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या चर्चा आहेत .

शर्मा हे ठाणे खंडणी विरोधी पथकाचे प्रमुख म्हणून कार्यरत होते. निवृत्तीपूर्वीच 4 जुलैला त्यांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारण्याचा अर्ज केला होता.