
वर्धा :- “पक्ष वाढवायचा असेल तर आपल्याला कडव्या कार्यकर्त्यांची फळी लागेल. त्यासाठी आपल्या बुथ कमिट्या पूर्ण करा.” असे महत्त्वपूर्ण आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केले. हे आवाहन वर्धा येथे राष्ट्रवादी परिवार संवाद दौऱ्यावेळी केले. या निमित्ताने वर्धा येथे महात्मा गांधींच्या बापू कुटीमध्ये जाऊन ते नतमस्तक झाले. “वर्धा मतदारसंघात तरुणांची फळी सक्षम करायला हवी. त्यामुळे पक्षाला मोठी मदत होईल.
पक्ष चालवत असताना प्रदेश, महिला, युवक, युवती, विद्यार्थी यात समन्वय पाहिजे.” तसेच “देशात दिग्गजांचा पराभव झाला. स्वर्गीय इंदिरा गांधीही त्यात अपवाद नाही. झालेला पराभव मागे टाका आणि कामाला लागा. आपले मनोधैर्य वाढण्यासाठीच राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा आपल्या भागात आली आहे.” असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादीच्या या परिवार संवाद यात्रेला २८ जानेवारीपासून पहिल्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. या निमित्ताने पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. या दौऱ्यात विदर्भ आणि खानदेशातील १४ जिल्हे, ८२ मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार आहे. शिवाय कार्यकर्त्यांच्या १३५ बैठका आणि १० जाहीर सभा होणार आहेत. या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात पक्षाचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल पटेल, गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh), अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, यांच्यासह अनेक नेते उपस्थित राहणार आहेत.
या परिवार संवाद यात्रेच्या माध्यमातून तळागाळात नेण्यात येईल. तसेच कार्यकर्त्यांना सक्षम करण्यासाठी ही यात्रा काढण्यात येणार आहे. असे जयंत पाटील यांनी सांगितले होते.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला