आत्महत्येसारखे अघोरी पाऊल कर्मचाऱ्यांनी उचलू नये; मंत्री ॲड.अनिल परब यांचे भावनिक आवाहन

एसटी कर्मचाऱ्यांना एक महिन्याचा पगार आणि अग्रीम आजपासून देणार

Anil Parab

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांच्या (ST Employees) आत्महत्येच्या पार्शवभूमीवर “काळ जरी कठीण असला तरी, आत्महत्येसारखे अघोरी पाऊल कर्मचाऱ्यानी उचलू नये” असे भावनिक अवाहन परिवहनमंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब (Anil Parab) यांनी केले आहे. तसेच, गेले तीन महिने एसटीच्या सुमारे ९७ हजार अधिकारी / कर्मचाऱ्यांचे थकीत असलेल्या वेतनापैकी ऑगस्ट महिन्याचे वेतन कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यावर आजपासून जमा होईल, ज्या कर्मचाऱ्यांना दिवाळी सणानिमित्त अग्रीम (बिनव्याजी उचल) हवा असेल त्यांना तातडीने अग्रीम देण्याचा प्रयत्न केला जाईल. उर्वरित दोन  महिन्यांच्या  वेतनापैकी एक वेतन दिवाळीपूर्वी देण्यात येणार असून, बाकी एक महिन्याचे वेतन देण्यासाठी शासनाकडे निधीची मागणी केली आहे, अशी माहिती मंत्री परब यांनी दिली आहे.

ते  म्हणाले की, टाळेबंदीमुळे अत्यावश्यक सेवा वगळता पाच महिने एसटीची प्रवासी वाहतूक बंद होती. त्यामुळे या काळात एसटीला प्रवासी वाहतुकीतून मिळणाऱ्या सुमारे तीन हजार कोटी रुपये महसुलावर पाणी सोडावे लागले. परंतु या काळातील इतर खर्च, जसे कर्मचाऱ्यांचे वेतन, गाड्यांची देखभाल, बसस्थानकांची पुनर्बांधणी यापोटी थकीत रक्कम वाढत गेली. २० सप्टेंबरपासून संपूर्ण महाराष्ट्रभर पूर्ण क्षमतेने एसटीची वाहतूक सुरू झाली आहे. परंतु कोरोना महामारीच्या भीतीमुळे सर्वसामान्य प्रवाशांनी सार्वजनिक वाहनातून प्रवास करण्याचे टाळले आहे.

याचा विपरीत परिणाम एसटीच्या प्रवासी वाहतुकीवर झाला आहे . त्यामुळे टाळेबंदीपूर्वी सुमारे दररोज ६५ लाख प्रवासी वाहून नेणाऱ्या एसटीकडे सध्या केवळ १३ लाख प्रवाशांची  चढ-उतार होत आहे. यातून दररोज सात  कोटी रुपयांचा महसूल मिळत असून टाळेबंदीपूर्वी दररोज २२ कोटी रुपये महसूल मिळत असे. प्रवासी संख्या दिवसागणिक वाढत आहे.  त्यामुळे लवकरच एसटी पूर्वपदावर येईल. याबरोबरच तिकीट विक्रीतून मिळणाऱ्या महसुलाव्यतिरिक्त इतर मार्गाने एसटीचा महसूल वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

मालवाहतूक, सर्वसामान्यांसाठी पेट्रोल – डिझेल पंप, टायर पुन॑: स्थिरीकरण प्रकल्प व्यावसायिक तत्त्वावर राबवणे, खाजगी वाहतूकदारांना बस बॉडी बिल्डिंग करून देणे , असे अनेक पर्याय महसूल वाढवण्यासाठी एसटीने निर्माण केले आहेत. परंतु त्यासाठीदेखील निधीची आवश्यकता असून एसटीची आर्थिक स्थिती भक्कम होईपर्यंत, शासनाने मदत करावी अशी विनंती आपण शासनाला केली असल्याचे मंत्री परब यांनी यावेळी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER