रक्कम चोरी करुन कर्मचारी पसार

Employee absconds by stealing money

मुंबई :- विवाह ठरल्याचे सांगून मालकाकडून रक्कम उधारी घेतल्यानंतर कर्मचार्‍याने कॅश काऊंटरमधील रोख रक्कम आणि धनादेशाच्या आधारे खात्यातून काढलेली रक्कम घेऊन पोबारा केल्याचा धक्कादायक प्रकार पवईमध्ये समोर आला आहे. याप्रकरणी फसवणूकीचा गुन्हा दाखल करुन पवई पोलीस तपास करत आहेत.

अंधेरी पुर्वेकडील मरोळ परिसरात राहात असलेल्या व्यावसायिक विजय शेट्टी (40) यांनी पवईतील हिरानंदानी येथील बार अ‍ॅन्ड रेस्टॉरंट चालविण्यासाठी घेतले आहे. गेल्या दोन वर्षापासून हॉटेलमध्ये पर्यवेक्षक म्हणून नोकरीला असलेला नरसींव्हा जोगू (28) हा त्यांचे बँकेतील सर्व आर्थिक व्यवहार पाहात होता. जोगू याने चार महिन्यांपुर्वीच विवाह करायचे असल्याचे सांगून शेट्टी यांच्याकडून 25 हजार रुपये उधार घेतले.

नेहमीप्रमाणे 8 तारखेला शेट्टी यांनी खात्यातून 40 हजार रुपये काढण्यासाठी जोगू याला बँकेत पाठविले. दुपार झाली तरी तो न परतल्याने शेट्टी यांनी त्याच्या मोबाईलवर कॉल केला असता मोबाईल बंद आला. तोपर्यंत खात्यातून रक्कम काढल्याचा मॅसेजही शेट्टी यांना आला होता. संशय आल्याने शेट्टी यांनी कॅश काऊंटर तपासले असता त्यातील 40 हजार रुपये त्यांना दिसले नाही. जोगू यानेच ही रक्कम चोरी करुन पळ काढल्याची खात्री पटल्याने अखेर शेट्टी यांनी पवई पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.