महायुती, आघाडीचा दारोदारी प्रचारपत्रके वाटून प्रचारावर जोर

रत्नागिरी/प्रतिनिधि :- विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता खऱ्या अर्थाने रंग चढला असून युती आणि आघाडी देखील पूर्ण ताकदीनिशी उभी राहिली आहे. दारोदारी मतदारांची भेट घेऊन प्रचारपत्रके वाटण्यावर सध्या दोन्ही उमेद्वारानी भर दिला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही दिवस उरलेले असताना संपूर्ण मतदारसंघात काही उमेदवारांना पोहोचणे अवघड झाले आहे. त्यामुळे किमान प्रचाराची पत्रके तरी घरोघरी पोहोचतील याची व्यवस्था सर्वच पक्षांकडून करण्यात आली आहे. परिणामी कोणत्या उमेदवाराने कोणत्या विकासकामांचे आश्वासन दिले आहे. कोणती कामे याआधी केली आहेत याची माहिती मतदारांपर्यंत पोहोचली आहे.

ही बातमी पण वाचा :  पूर्णा : वाहनांतून प्रचार करतांना विविध पक्षांकडून आचारसंहितेचा भंग; गुन्हा दाखल

रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात महायुतीतर्फे उदय सामंत हे निवडणूक रिंगणात आहेत. तीनवेळा निवडून आलेले उदय सामंत हे यावेळी चौथ्यांदा भाग्य अजमावत आहेत. प्रचारामध्ये त्यांनी आजवर मतदारसंघात केलेल्या विकासकामांची माहिती मतदारांसमोर ठेवली जात आहे. याच मतदारसंघात राष्ट्रवादी कॉँग्रेसचे उमेदवार सुदेश मयेकर हे रिंगणात आहेत. त्यांनीही १५ वर्षांपेक्षा अधिक काळ राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नगरसेवक, तालुकाध्यक्ष म्हणून काम केले आहे. वंचित आघाडी व अन्य पक्ष मिळून एकूण ६ उमेदवार रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात आहेत.

कसलाही गाजावाजा नाही की मोठ्या नेत्यांची सभा नाही. या स्थितीत अत्यंत शांततेने सर्वच पक्ष या मतदारसंघात प्रचार करीत आहेत. छोट्या सभा, घरोघरी प्रचार सुरू आहे. यातही वेळेअभावी अनेक भागांमध्ये उमेदवार व कार्यकर्त्यांना पोहोचणे शक्य झालेले नाही. त्यामुळे निवडक कार्यकर्त्यांकडे पक्षाच्या जाहीरनाम्याची पत्रके घरोघरी वाटपाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. काही ठिकाणी वृत्तपत्र वितरकांकडून वितरीत होणाऱ्या वृत्तपत्रांमधूनही ही प्रचार पत्रके वितरीत करण्यात आली आहेत. या पार्श्वभूमीवर प्रचाराच्या तोफा थंडावल्या असून व्यक्तीगत भेटीगाठींवरच आता जोर दिसून येत आहे.