इमोशनल हायजॅक !

emotion

आज-काल शाळाशाळांमधून आणि पालकांमधून या तक्रारी नेहमी येतात. ही मुलं खूप लवकर चिडतात, उलट उत्तर देतात, लवकर आक्रमक होतात .त्यांच्या लक्षात राहत नाही .एकाग्रता होत नाही .एकत्र मिळून कुठलाही काम करू शकत नाही ,लवकर निराश होतात आणि नको ती पावले उचलतात .छोट्या छोट्या गोष्टींचे उगीच दडपण घेतात ,वाद-विवाद करतात, दुसर्‍याच्या भावना समजून घेणे तर फार दूरची गोष्ट !

या पार्श्वभूमीवर सध्याची शाळा आणि शिक्षण पद्धती बघितली तर त्याचे पण भयावह चित्र समोर उभे राहते. अर्धवट झोपेतून उठून आरडाओरड करत तयार झालेली मुले, बस मधून दूरच्या शाळेत जातात .संध्याकाळी चार ते सहाच्या दरम्यान घरी परततात .परत कुठला तरी हॉबीक्लास, ट्युशन. त्याचबरोबर दररोजचे होमवर्क, अनेक चाचण्या आणि परीक्षेचे दडपण . मार्कस मिळवण्यासाठी येणारा ताण तणाव. शाळेत शिस्तीचे वातावरण आणि शाळेतील गुणांवर हुशारी ठरवणारे आई-वडील. या सगळ्यांमध्ये विद्यार्थी खरंच सक्षम होतो का ?आव्हानांना, बदलांना तोंड देऊ शकतो का? हे विचार करण्यासारखे मुद्दे आहेत.

स्वामी विवेकानंद नेहमी म्हणत की, “चारित्र्यसंपन्न करणार, माणूस घडवणार शिक्षण आपण आपल्या विद्यार्थ्यांना द्यायलाच हवं ! “

पण प्रत्यक्षात खरंच असं होतंय ? आपणास सगळेजण भावनिक बुद्धिमत्तेला खूप महत्त्व आलंय हे पण घोकतो आहोत. पण प्रत्यक्षात काय ?

मुलांना भावनिक कौशल्य शिकवण्याची गरज असते का ? ती नैसर्गिक रित्या येत नाहीत का ? तर नाही ! इतर गुण रुजवावे लागतात, त्याचप्रमाणे भावनीक कौशल्यही रुजवावी लागतात. आणि शाळा हेच त्यासाठी उत्तम ठिकाण आहे. पुन्हा यामुळे मुलांना अभ्यासात आणि वर्गाचे वातावरण राखण्यात मदतच होत असते. त्यामुळे शाळेचा वेळ वाया जातो असं नाही म्हणता येत . आणि हे अनेक बाल मानसशास्त्रज्ञ आणि शिक्षण तज्ञांनी मान्य केले आहे. एक व्यक्ती म्हणून चांगलं बनवणे साधते ते भावनांच्या प्रशिक्षणाने !

गेल्या दोन दशकात मेंदु विज्ञानातील संशोधनातून ,बालमानसशास्त्रज्ञानातील अध्ययनाशी व शिक्षणाशी संबंधित अनेक गोष्टी पुढे आल्या. आणि त्यानुसार मुलांच्या मनातील भावना व त्यांचे शिक्षण या दोन गोष्टींची फारकत होऊच शकत नाही. त्यामुळेच आकलनशक्ती ,स्मरणशक्ती वाढीस लागते. कारण स्मरणशक्ती ही तिला दिली जाणारी माहिती व त्यांच्याशी निगडित असणाऱ्या भावना यांच्या एकत्रीकरणातून येते .मेंदूमधील भावनेचे आणि स्मरणशक्तीचे केंद्र एकाच भागात आहे. संकल्पना ग्रहण करण्याचे काम बुद्धीचे असले तरी मनातील भावना ,मेंदूला उत्तेजित आणि ग्रहणशील बनवतात.

आपण मागील एका लेखामध्ये लिंबिक सिस्टिम म्हणजे भावना केंद्र आणि लेफ्ट प्री फ्रांटल कॉर्टेक्स, वैचारिक केंद्र यांच्यातील जोडण्या यांच्याबद्दल बघितलं होतं. आज थोडा यातील पुढील भाग बघूया. कारण हा शास्त्रीय आधार जर कळला तर एखाद्या गोष्टीचे महत्त्व पटायला निश्चितच मदत होते. आज आपण प्रत्येक गोष्ट बुद्धीच्या कसोटीवर घासून बघत असतो.

इतर प्राण्यांपेक्षा मानवी मेंदू ही मानवाला मिळालेली देणगी आहे. साडेतीन पाऊंड वजनाच्या मानवी मेंदूत ३० अब्ज पेशी व त्यांना जोडणारे असंख्य दुवें आहेत. त्यातूनच संवेदनांच, विचारांचं, संदेशांचे वहन होतं. आज आपण भावनिक मेंदूची जास्त माहिती घेऊया.यामध्ये Thalamus आणि Amygdala असे दोन भाग असतात. त्यापैकी अमिगडेला हे भावनांच मेन ऑफिस. कारण यातूनच भावना व कृती यांचे संदेशवहन होत असतं. दुःख झालं की डोळ्यातून अश्रू येतात .राग आला की वस्तू आपटली जाते.

Thalamus आणि Hippocampus या भावनिक मेंदूच्या भागात आत अवधान व स्मरण शक्ती यांच केंद्र आहे. म्हणून मूल काय शिकत, यापेक्षा ते कसं शिकतं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. राग भीती दुःख अशा भावना मनात असतील तर मूल शिकू शकत नाही. कारण यावेळी स्मरणशक्ती नियंत्रण करणारा भाग hippocampus हा भाग तात्पुरता बंद होतो.
याबाबत आपण एक उदाहरण बघू !

१) आपण वावरत असताना समोर एखादी व्यक्ती येते.–संवेदना Thalamus ला पोहोचल्या. इथे फक्त संविधानामुळे धोका आहे की नाही इतकच विश्लेषण होतं.
२) धोका नाही हे कळल्यावर संवेदनांच वहन सरळ वैचारिक मेंदूपर्यंत केलं जातं. वैचारिक मेंदू संवेदनान्वर विचार करतो. की चेहरा ओळखीचा आहे का? तर्कनिष्ठ विश्लेषण होतं. लेबल लावल्या जातो -ओळखीचा चेहरा. हवा तर त्याचं नाव.

नंतर –

३) ही संवेदना भावनिक मेंदूच्या Amygdala येथे जाते. तेथे भावनांचे कल्लोळ असतात. आनंद होण, आदर वाटण.आणि मेन ऑफिस मधून सिग्नल दिला जातो.

कृती घडते. चेहऱ्यावर हसू येत. शेक हँड्स साठी हात पुढे होतो.. हाच तो विचार भावना कृतींचा तर्काधिष्ठित समन्वय. विजेच्या वेगाने ही कृती घडते.

याउलट आता दुसऱ्या उदाहरणांमध्ये एखादा चेहरा समोर येतो.

१) संवेदना डोळ्यामार्फत प्रथम Thalamus कडे. येथे विश्लेषण होते धोकादायक की नाही ?
( न आवडती व्यक्ती) म्हणजे धोका !
२) यावेळी संवेदना वैचारिक मेंदूकडे न पोहोचता तात्काळ Amigdala ला पोहोचवल्या जातात. येथे भावना रुपी रसायनांचा कल्लोळ उठतो. राग, घृणा, तिरस्कार. क्षणभर आपण थिजतो. याला इमोशनल हायजॅक किंवा amygdala हायजॅक अस शास्त्रीय भाषेत म्हणतात. यामध्ये वैचारिक मेंदूला टोटली बायपास केलं जातं. तर्कनिष्ठ विचारांशिवायच्या भावना शरीरावर काबू करतात.
३) म्हणून रोजच्या जीवनात आपण म्हणतो, यामुळे मी ट्रिगर झालो/झाले. तेव्हा आपण असे इमोशनली हायजॅक होतो. पुढच्या व्यक्तीच्या वागण्याने मी दुखावले गेले, माझा अपमान झाला वगैरे. आणि मग रागाच्या भरात होणारी कृत्य घडतात. क्षणकाळाच्या उद्भवलेल्या भावनेतून कित्येक अक्षम्य चुका घडतात, गुन्हे घडतात.

मागाहून व्यक्तीला ह्याचे दुःख व पश्चात्ताप देखील होतो. कारण काही काळानंतर या संवेदना विश्लेषणासाठी वैचारिक मेंदूपर्यंत पोहोचतात. त्याचे विश्लेषण होते, तर्काधिष्ठित विचार होतो पण मग उशीर झालेला असतो. आपण वर बघितल्याप्रमाणे शाळेतील मुलांबाबत .

मुलांचा अभ्यास घेताना आई रागवते.

१) आईचा चेहरा पाहून धोका हा संदेश! पुढे तात्काळ amygdala कडे रवानगी.
२) अभ्यास करणाऱ्या वैचारिक मेंदूला बायपास.
३)amygdala मध्ये प्रचंड भीती. परिणाम संवेदना गोठणे, थिजुन जाणे. त्यामुळे मेंदू प्रतिसादच देत नाही. मूल परीक्षेला जातं. पेपर पाहताच घाबरतं. हुशार असूनही सारं काही विसरून जातं.

या उलट शांत, समजून अभ्यास केलेल्या मुलाचा, अभ्यास करतानाचा प्रत्येक संदेश वैचारिक मेंदूकडे पाठवल्या जातो. त्याची छाननी होऊन साठवल्या जातो. आता कठीण पेपराला आला तरी आनंदात अभ्यास करतानाची सवय Thalamus ला लागलेली आहे. प्रत्येक संदेश वैचारिक मेंदूकडे पाठवण्याची , तर्कनिष्ठ छाननी करून येण्याचीच सवय लागल्याने मुल परीक्षेला छान सामोरे जात. ते गडबडून जात नाही.

इमोशनल हायजॅकिंगच तत्त्व आपण ठेवू शकतो का ? या अवस्थेला पर्याय आहे का? तर आहे. लहानपणापासूनच भावनिक बुद्धिमत्ता वाढवणं. आणि त्यातील महत्त्वाचं म्हणजे स्वतःच्या आणि दुसर्‍याच्या भावना ओळखणे, अर्थात “भावनिक आत्मभान” हेच त्याला उत्तर आहे.

मानसी गिरीश फडके
समुपदेशक व सायकोथेरपिस्ट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER