एलिस पेरीचा दुहेरी सन्मानाचा दुहेरी विक्रम

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकाच खेळाडूला ‘विस्डेन’चा वर्षातील आघाडीचा क्रिकेटपटू आणि ‘विस्डेन’च्या वर्षातील सर्वोत्तम पाच खेळाडूंपैकी एक असा दुहेरी सन्मान क्वचितच मिळतो. पुरुषांमध्ये कुमार संगकारा, केन विल्यमसन आणि विराट कोहली यांनी हा मान मिळवला आहे. महिलांमध्ये अद्याप कुणालाच हा मान मिळालेला नव्हता पण आता आस्ट्रेलियाची अष्टपैलू एलीस पेरी ही अशी पहिली महिला क्रिकेटपटू ठरली आहे. एवढंच नाही तर वर्षातील आघाडीची महिला क्रिकेटपटू हा सन्मान दुसऱ्यांदा मिळविणारी ती पहिलीच महिला खेळाडू आहे. यापूर्वी 2016 मध्येषती लिडींग वुमन क्रिकेटर इन द वर्ल्ड ठरली होती. आता 2019 साठी तिला ‘विस्डेन’ने पुन्हा एकदा हा सन्मान दिला आहे.

विस्डेनने 2016 मध्ये म्हटले होते की, सातत्य हा महानतेचा निकष असेल तर पेरीने तो उंचावला आहे. आता 2019 मधील कामगिरीने तिने तो निकष अधिकच उंचावला आहे. वर्षातील आपल्या एकमेव कसोटी सामन्यात तिने शतकासह आणखी नाबाद 76 धावांची खेळी केली. याशिवाय एकदिवसीय सामन्यांमध्ये तिने 73 च्या सरासरीने दोन शतकांसह भरपूर धावा जमवल्या. याशिवाय सहा टी-20 सामन्यांमध्ये तर तिची सरासरी दीडशे धावांची राहिली. याच्या जोडीला वन डे सामन्यांमध्ये 21 आणि टी-20 सामन्यांमध्ये सहा विकेट तिच्या नावावर आहेत.

टी- 20 क्रिकेटमध्ये एक हजाराच्यावर धावा आणि शंभराच्यावर बळी अशी अष्टपैलु कामगिरी करणारी ती एकमेव आहे. कोणत्या पुरुष खेळाडूलासुध्दा हे जमले नाही.

2019 च्या आरंभी अडिलेड कसोटीत तिने नाबाद शतक झळकावले, कँटरबरी येथे डावात सात बळी मिळवण्याची कामगिरी केली आणि टाँटन येथील अशेस कसोटीत ती प्लेयर.आफ दी मच ठरली. बिग बश लीगमध्ये सिडनी सिक्सर्सतर्फे अलिसा हिलीसोबत तिने 199 धावांची विक्रमी सलामी दिली. तिने लिहिलेले पुस्तक, परस्पेक्टिव्ह, डिसेंबरमध्ये प्रकाशीत झाले.

2016 पर्यंत तिला आघाडीच्या फलंदाजी फळीत स्थान नव्हते. मात्र 2016 पासून तिने चौथ्या स्थानावर आपले नाव लावले आणि या क्रमांकावर फलंदाजी करताना 18 खेळी अर्धशतकाच्यावर केल्या आणि 15 वेळा नाबाद राहात सरासरी 69 अशी भक्कम ठेवली.

टी-20 मध्येही 64 पैकी 28 डावात ती नाबाद राहिली. गोलंदाजीतही नव्या चेंडूने मारा करताना तिची कामगिरी प्रभावी राहिली. विशेषतः कँटरबरी येथे इंग्लंडविरुध्द तिसऱ्या वन डेत तिच्या गोलंदाजीने इंग्लंडची भंबेरी उडवली. 22 धावात 7 बळी अशी तिची कामगिरी राहिली आणि इंग्लंडची कर्णधार शार्लेट एडवर्डसने तिचे वर्णन महानतम महिला क्रिकेटपटू आम्ही बघतोय असे वर्णन केले.

विस्डेनच्या वर्षातील आघाडीच्या महिला क्रिकेटपटू
2014- मेग लनिंग (आस्ट्रेलिया)
2015- सुझी बेटस् (न्यूझीलंड )
2016- एलीस पेरी (आस्ट्रेलिया )
2017- मिताली राज (भारत)
2018- स्मृती मानधना (भारत)
2019-.एलिस पेरी (आस्ट्रेलिया)