महापालिकेचा डेंग्यूविरोधात एल्गार

Mallinath Kalshetty

कोल्हापूर : शहरात डेंग्यूच्या आजाराने उचल खाल्ली आहे. यापार्श्वभूमीवर बेसमेन्टला पाणी साचल्यास संबंधित इमारतींवर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी यांनी दिले आहेत. डेंग्यू निर्मुलनासाठी विशेष पथकांची नेमणुक करण्याचे आदेशही आयुक्तांनी महापालिका प्रशासनाला दिले. महापालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये पावसाळयाच्या पार्श्वभूमीवर डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी आढावा बैठक घेतली. सर्व्हेक्षण करताना संवेदनशील भागाचा प्राधान्याने विचार करुन याभागामध्ये दैनंदिन सर्व्हेक्षण करण्याच्या सुचना आयुक्तांनी दिल्या.

अतिरिक्त आयुक्त, सहाय्यक संचालक नगररचना, शहर अभियंता, उपशहर अभियंता यांनी शहरामध्ये ज्या-ज्या भागामध्ये बांधकामे सुरु आहेत, तसेच बेसमेंटमध्ये पाणी साठलेले आहे. त्या भागामध्ये फिरती करुन त्याचा अहवाल तीन दिवसात द्यावा, ज्याठिकाणी पाणी साठले आहे त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करा. शहरातील महापालिकेच्या सर्व शाळेंच्या विद्यार्थ्यांची जनजागृतीसाठी प्रभागामध्ये एकाच वेळी प्रभात फेरीचे आयोजन करा. क्रिडाई सदस्यांची बैठक आयोजित करुन बांधकाम व्यवसाईक यांना बांधकामाच्या ठिकाणी पाणी साठू न देणेबाबत सुचना द्या. डेंग्यू प्रतिबंधात्मक शहरात प्रचार व प्रसार करा, प्रत्येक आठवडयाला डेंग्यूबाबत आढावा बैठक आयोजित करा. आरोग्य विभागाकडील सर्व कर्मचारी यांचे डेंग्यू उपाय योजनेबाबत प्रशिक्षणाचे आयोजन करण्याचे आदेश आयुक्त डॉ. कलशेट्टी यांनी दिले.

यावेळी अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, उपआयुक्त मंगेश शिंदे, मुख्य लेखापरिक्षक धनंजय आंधळे, सहाय्यक संचालक नगररचना प्रसाद गायकवाड, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, उपशहर अभियंता हर्षजित घाटगे, जल अभियंता सुरेश कुलकर्णी, आरोग्याधिकारी डॉ.दिलीप पाटील, वैद्यकिय अधिकारी डॉ.अमोल माने, आदी उपस्थित होते.