शेतकरी आणि सरकारमधली अकरावी फेरीही निष्फळ, कुठलाही तोडगा नाही

नवी दिल्ली : दिल्लीच्या सीमेवर आज सलग 58 व्या दिवशी शेतकर्‍यांचे आंदोलन सुरू आहे. दरम्यान, नवी दिल्लीत 11 व्या फेरीची बैठकही निष्फळ ठरली. आज पुन्हा सरकार आणि शेतकरी यांच्यादरम्यान चर्चेची अकरावी फेरी विज्ञान भवनात पार पडली. बैठकीतूनही काही तोडगा निघाला नसून पुढील बैठकीची तारीख अद्याप ठरलेली नाही. बैठकीत कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर म्हणाले की, 11 व्या फेरीत चर्चा झाली आहे. मात्र, अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.

दोन वर्षासाठी कायदे स्थगित करण्यास सरकार तयार आहे. दोन वर्षासाठी कायदे स्थगित करण्याचा प्रस्ताव सरकारने शेतकऱ्यांसमोर मांडला आहे. शेतकऱ्यांना हा प्रस्ताव मान्य असल्यास पुढील बैठक घेण्यात येणार असल्याचं कृषी मंत्र्यानी सांगितलं, असे शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी सांगितले. तसेच येत्या 26 जानेवरीला ट्रॅक्टरसह दिल्लीला कूच करणार असून रॅली काढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आम्हाला मंत्र्यांनी तब्बल तीन ते साडेतीन तास वाट पाहायला लावली. हा शेतकऱ्यांचा अपमान आहे. त्यांनी बैठकीत पुन्हा मागील बैठकीत मांडण्यात आलेल्या प्रस्तावावर चर्चा केली. कृषी कायदे दोन वर्ष स्थगित करण्याचा प्रस्ताव मांडला असून यावरच बैठकांच्या फेऱ्या संपतात, असे बैठकीत मंत्र्यांनी म्हटल्याचे शेतकरी नेते एस. एस. पंधार यांनी सांगितले. तसेच त्यांनी शेतकरी आंदोलन शांततेत सुरुच राहणार असल्याचेही सांगितले.

केंद्र सरकारने शेतकरी आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. मात्र, शेतकऱ्यांनी समितीच्या निष्पक्षपातीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. कृषी कायदे मागे घ्यावे, ही मागणी शेतकरी संघटनांनी केली आहे. जोपर्यंत कायदे रद्द होत नाहीत. तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका शेतकरी संघटनांनी घेतली आहे.

संयुक्त कृषी मोर्चाच्या वतीने येणाऱ्या प्रजासत्ताक दिनी (दि. 26 जाने.) दिल्लीत ट्रॅक्टर रॅली काढण्यात येणार आहे. 40 प्रमुख शेतकरी संघटनांसह देशभरातील सुमारे 500 शेतकरी संघटनांचे हजारो शेतकरी आंदोलन करत आहेत. मात्र, आतापर्यंत त्यांच्या मागण्या केंद्र सरकारने मान्य केल्या नाहीत. त्यामुळे आता निर्णायक वेळ आली असल्याचे म्हणत शेतकऱ्यांनी हा इशारा दिला.

दरम्यान, बैठकीनंतर नरेंद्रसिंह तोमर म्हणाले, मी हे कठोर अंतःकरणाने सांगतोय की शेतकर्‍यांकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही हे दुर्दैवी आहे. तुमच्या सहकार्याबद्दल सरकार कृतज्ञ आहे. कायद्यात कोणतीही कमतरता नाही. आम्ही तुमच्या सन्मानार्थ एक प्रस्ताव ठेवला आहे. आपण निर्णय घेऊ शकला नाहीत. आपण एखाद्या निर्णयापर्यंत पोहोचल्यास माहिती द्या. यावर पुन्हा चर्चा करू. तर बैठकीनंतर शेतकरी नेते म्हणाले की आम्ही कायदा रद्द करण्याच्या मागणीवर ठाम आहोत, आंदोलन कायम राहील. वाटाघाटीची पुढील तारीख निश्चित केलेली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER