वीज बिल हरित पद्धतीनं

nitin raut & Diwali

Shailendra Paranjapeदीपावली आली, फटाकेविक्री २० ते ३० टक्क्यांनी कमी झालीय आणि कायद्यापेक्षाही जनसाक्षरता अधिक प्रभावी ठरते, हे फटाक्यांच्या कमी वापरावरून दिसूनही आलेय. मुळात कोरोनानं लोकांना आर्थिक संकटात लोटलेलं आहे. त्यामुळे दिवाळी साजरी करताना फटाके ही कदाचित प्राधान्याची वस्तू राहिली नसावी.

दिवाळीच्या आधी वीज बिलाच्या प्रश्नावरून राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षानं सरकारला विशेषतः ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांना धारेवर धरले होते. घरगुती वीज बिलाच्या रकमेत झालेली प्रचंड वाढ, हे त्यामागचे कारण होते. दिवाळीच्या काळात वीज बिलांबद्दल एक चांगली बातमी स्थानिक वृत्तपत्रातून आलीय. हरित उपक्रमांतर्गत वीज वितरण कंपनीनं वीज बिल ई-मेल किंवा एसएमएसद्वारे स्वीकारून ते ऑनलाईन भरणाऱ्या वीज ग्राहकांना १० टक्के सूट देण्याचा उपक्रम राबवलेला आहे. या उपक्रमात महाराष्ट्रामध्ये एकूण सुमारे १.८० लाख वीज ग्राहकांनी गो ग्रीन या योजनेत सहभाग घेतला आहे.

विशेष म्हणजे हरित पद्धतीचा अवलंब करून बिलं स्वीकारणाऱ्या आणि भरणा करणाऱ्यांमध्ये २५ टक्के ग्राहक पुण्यामधले आहेत. पुण्यातल्या सुमारे ४४ हजार वीज ग्राहकांनी कागदी बिल स्वीकारणं बंद केलं आहे. ही निश्चितच स्वागतार्ह बाब आहे. पर्यावरण संवर्धन करणं, प्रदूषण कमी करून पर्यावरणाचं संवर्धन करणं, पर्यावरणपूरक जीवनशैली अनुसरणं, या साऱ्या बाबी अनेकदा सभा-समारंभांमधून सांगितल्या जातात. पर्यावरणदिनाच्या दिवशी शपथेवर तसं वागण्याचं वचन दिलं जातं. सामूहिक शपथाही घेतल्या जातात. पण पर्यावरणदिन संपला की, लोक पुन्हा प्लास्टिककडे वळतात, रस्त्याने जाता जाता सहजपणे थुंकतात. आलिशान मोटारीतून एसी चालू असताना हळूच काच खाली करून चिप्सचं रॅपर रस्त्यावर भिरकावून देतात.

या सर्व पार्श्वभूमीवर गो ग्रीन योजनेत सहभाग घेणाऱ्या सर्वच नागरिकांचं कौतुक करायला हवं. सामान्यतः आपल्या व्यवस्थेत वीज बिलाची गरज निवासी पत्त्याचा पुरावा, कार्यालयाच्या जागेचा पुरावा म्हणून उपयोगी पडतो. त्यामुळे वीज बिलं जपून ठेवली जातात. दिवाळीत फटाक्यांमुळे प्रदूषण होते, हे बरोबरच आहे. पण त्याबद्दल उत्साहान बोलणाऱ्या सर्वांनीच वीज बिल कागदी स्वरूपात घेण्याचं बंद करायला हवं. त्याबरोबरच एरवी पर्यावरणदिनाचे कार्यक्रम आयोजित करून वार्षिक प्रसिद्धी मिळवणाऱ्यांनीही कागदी स्वरूपात वीज बिलं स्वीकारणं बंद करायला हवं.

तरच त्यांचं पर्यावरणाबद्दलचं प्रेम खरं असल्याचं सिद्ध होईल. मला काय त्याचे, असा प्रश्न अनेक जण अनेक संदर्भात विचारत असतात. पण एसएमएस किंवा ई-मेलद्वारे वीज बिल स्वीकारणं आणि भरणाही ऑनलाईन करणं, या विषयात मला काय त्याचे हा प्रश्न गैरलागू ठरतो. कारण फटाके उडवणारा नकळत प्रदूषण वाढवण्याला कारणीभूत होतो. एखाद्याच्या जीवाला धोका निर्माण होण्यालाही कारणीभूत ठरू शकतो. तसंच मला काय त्याचे, असा प्रश्न विचारून पर्यावरणपूरक अशा या गो ग्रीन उपक्रमाची उपेक्षा केली तर आपण पर्यावरण प्रदूषणाला हातभार लावणारे समाजघटक ठरू. त्यामुळे प्रत्येकानं गो ग्रीन उपक्रमाचा भाग व्हायला हवं.

वीज वितरण कंपनीच्या संकेतस्थळावरून म्हणजेच वेबसाईटवरून ग्राहकांना पत्त्याच्या निवासाच्या पुराव्यासाठी गेल्या वर्षभरातल्या बिलांचे प्रिन्ट आउट मिळू शकतात. त्यामुळे आवश्यकता भासेल तेव्हाच त्याचा वापर करून गो ग्रीनमध्ये सहभाग घ्यायला हवा. दिवाळीचं स्वागत करताना पुणेकरांनी गो ग्रीन उपक्रमात घेतलेल्या सहभागाची बातमी आलीय. त्यापासून आपण सर्वांनीच प्रेरणा घ्यायला हवी. दीपावलीला अंधारावर उजेडाची मात साजरी करतानाच पर्यावरण प्रदूषणाचा अंधार घालवून गो ग्रीनचा आग्रह सर्वांनाच करू या. गो ग्रीनमधला सहभाग अधिकाधिक वाढला तरच दिवाळी खऱ्या अर्थानं साजरी केल्यासारखं होईल.

शैलेंद्र परांजपे

Disclaimer :– ‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER