ओबीसींना आरक्षण मिळणार नसेल तर निवडणुका होऊ देणार नाही; पंकजा मुंडेंचा इशारा

Pankaja Munde

औरंगाबाद :- ओबीसी समाजाला आरक्षण मिळणार नसेल आणि ओबीसींना योग्य राजकीय प्रतिनिधीत्व मिळणार नसेल तर आम्ही राज्यात निवडणुका होऊ देणार नाही, असा थेट इशारा भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी दिला आहे. ओबीसींच्या आरक्षणासाठी जनगणनेची आवश्यकता नाही, इम्पिरिकल डाटा तयार करूनही ओबीसींना आरक्षण दिले जाऊ शकते, असंही पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं. पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन ओबीसी आरक्षणावर आपली भूमिका स्पष्ट केली.

यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या, ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाचा निर्णय आमच्यासाठी खूपच धक्कादायक आहे. या सरकारला ओबीसींची बाजू मांडायचीच नव्हती हा माझा दावा आहे. मागच्या सरकारमध्ये आम्ही अभ्यासगट स्थापन करून आरक्षण कायम ठेवण्यासाठी पुरजोर प्रयत्न केले. आम्ही अध्यादेश काढून कोर्टात सादर केला. महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार आल्यानंतर १५ महिन्यात त्यांनी काहीही केले नाही. अध्यादेशही लॅप्स झाला. ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण झाल्याचं या सरकारने कोर्टात मान्य केलं आणि इथेच सर्व गमावलं, असा आरोप पंकजा यांनी केला.

ओबीसींना जर आरक्षण मिळणार नसेल तर आम्ही गप्प राहणार नाही. ओबीसींना राजकीय आरक्षण मिळणार नसेल तर आमची निवडणुका घेण्याची मानसिकता नाही. आम्ही राज्यात निवडणुका होऊ देणार नाही, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. राजकीय प्रतिनिधित्व करणाऱ्या आमच्या जागाच रद्द झाल्याने आम्ही वंचित राहणार असेल तर निवडणुकी कशासाठी घ्यायच्या? आरक्षण नसेल तर वंचित घटक मुख्य प्रवाहात कसा येईल. या निवडणुका केवळ धनदांडग्यांसाठी राखीव राहतील. आरक्षण नसलं तर न्यायप्रक्रियेमुळे निवडणुका होणारच नाही.

मराठा असो वा ओबीसी आरक्षण असो सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. सरकार आणि कॅबिनेट शक्तीशाली असत. अजूनही ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर तोडगा निघू शकतो. मागास आयोग नेमून ओबीसी आरक्षण कायम ठेवू शकता. मंत्रिमंडळाची उपसमिती स्थापन करून हा निर्णय घेण्याची गरज आहे. ओबीसींची जनगणना हा मुद्दा वेगळा आहे. इथे इम्पेरिअल डाटा आवश्यक आहे. हा राज्याचा विषय असल्याने जनगणना न करता इम्पिरिकल डाटाच्या आधारे आरक्षण देता येऊ शकतं, असं त्यांनी स्पष्ट केलं.

ही बातमी पण वाचा : आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाला रोजगारसह ३ हजार कोटींचे पॅकेज द्या; नारायण राणेंची मागणी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button