हद्दवाढ झालेल्या साताऱ्यातील भागात लवकरच निवडणुका

सातारा : सातारा (Satara) शहरात हद्दवाढ झालेल्या भागात लवकरच निवडणूक (Elections) होणार असल्याचे संकेत आहेत. राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commission) वाढीव भागातील लोकसंख्या तसेच नकाशे जिल्हा प्रशासनाकडून दि. 30 सप्टेंबरपर्यंत मागितले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय संबंधित माहिती तत्काळ सादर करण्याचे आदेश सातारा नगरपालिका प्रशासनाला दिले आहेत. शासनाने दि. 22 मार्च 2017 रोजी अधिसूचना काढून सातारा नगरपालिका हद्दीमध्ये क्षेत्र समाविष्ट केल्याबाबतची उद्घोषणा प्रसिद्ध केली होती. त्यानंतर नगर विकास विभागाने दि. 7 सप्टेंबर 2020 ला नगरपालिकेच्या हद्दवाढीची अंतिम अधिसूचना काढली.

राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने अध्यादेश काढून सातारा शहराच्या हद्दवाढीचा रखडलेला प्रश्न मार्गी लावला. हद्दवाढीमुळे शाहूपुरी, दरे खुर्द आणि विलासपूर या ग्रामपंचायत बरखास्त केल्या जाणार आहेत. शाहूपुरी गण रद्द झाला आहे. शहराचा क्षेत्रफळाच्यादृष्टीने पूर्वीपेक्षा तिप्पट विस्तार झाल्याने रहिवास क्षेत्र वाढले आहे. अजिंक्यतारा किल्ला, चारभिंती ही ऐतिहासिक ठिकाणे नगरपालिकेच्या ताब्यात आल्याने त्यांच्या विकासाला वाव मिळणार आहे. पूर्वेस पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 (नवीन) च्या पश्चिमेकडील मौजे खेड व मौजे गोडोलीमधील काही भाग; पश्चिमेस मौजे दरे खुर्दचे संपूर्ण क्षेत्र यवतेश्वर डोंगर पायथ्यापर्यंत, दक्षिणेस मौजे गोडोली पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 (नवीन) च्या पश्चिमेकडील संपूर्ण भाग अजिंक्यतारा किल्ल्यासह सातारा शहराच्या उत्तरेस मौजे करंजे गावचा संपूर्ण भाग वेण्णा नदीपर्यंत, अशा सातारा शहराच्या नव्या सीमा आहेत.

सातारा शहरात नव्याने समाविष्ट झालेल्या भागात सहा महिन्यांत निवडणूक होणार आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे माहिती मागवली आहे. जनगणना कार्यालयाकडून 2011 च्या जनगणनेनुसार मूळ व हद्दवाढ क्षेत्राची प्रगणक गट निहाय लोकसंख्या आकडेवारी असलेली सीडी 30 रोजीपर्यंत उपलब्ध करुन द्यावी, असे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. प्रगणक गटाचे नकाशे सीडी स्वरुपात जनगणना कार्यलयाकडे उपलब्ध आहेत. त्यामुळे जनगणना कार्यालयाने घोषित केलेली प्रगणक गटनिहाय लोकसंख्या आणि नकाशे जनगणना कार्यालयाशी संपर्क साधून आवश्यक माहिती प्राप्त करून घ्यावी, असेही आयोगाने बजावली आहे.

जनगणना कार्यालयाने नागरी क्षेत्राची घोषित केलेली 2011 च्या जनगणनेनुसार मूळ व हद्दवाढ क्षेत्राची एकूण लोकसंख्या, अनुसूचित जातीची व अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येची माहिती, तपशिल, कोणत्याही परिस्थितीत दि. 6 आक्टोबर 2020 पर्यंत सातारा (मूळ नगरपालिका क्षेत्र), हद्दवाढ क्षेत्र, एकूण लोकसंख्या अशा तक्त्यात आयोगास सादर करावी, असे आदेशात म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER