४५ हजार सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा १८ जानेवारीपासून निवडणुकांचा आराखडा

सहकारी संस्था निवडणूक

पुणे : कोरोना (Corona) तसेच शेतकरी कर्जमाफीचे काम यामुळे निवडणुकीस पात्र असलेल्या राज्यातील सुमारे ४५ हजार सहकारी संस्थांच्या निवडणुका ३१ डिसेंबर २०२० पर्यंत स्थगित करण्यात आल्या होत्या. याबाबत शासनाचा पुढील आदेश न आल्याने राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने स्थगित केलेल्या संस्थांच्या निवडणुका घेण्याची तयारी सुरु केली आहे. ज्या टप्प्यावर निवडणुका स्थगित झाल्या होत्या, त्या टप्प्यापासून पुढे निवडणुका होणार आहेत. निवडणुकांबाबत १८ जानेवारीपर्यंत आराखडा तयार करण्याचे आदेश प्राधिकरणाचे सचिव यशवंत गिरी यांनी दिले आहेत.

कोरोनामुळे समुह संसर्गाचा धोका आणि तत्पूर्वी शेतकरी कर्जमाफीसाठी राज्यातील ४५ हजार २७६ सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे गेल्या. तसेच ३१ डिसेंबर २०२१ अखेर एकूण ६४ हजार ९९५ संस्था संचालकांची मुदत संपणार आहे. आता पहिल्या टप्यात निवडणुका पुढे गेलेल्या ४५ हजार संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. २५० पेक्षा कमी सभासद असलेल्या गृहनिर्माण संस्था वगळून या निवडणुका होणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे तीन हजार सहकारी संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु होणार आहे. यानिमित्ताने सहकारी साखर कारखाने, जिल्हा मध्यवर्ती का व इतर राज्यस्तरीय संस्था, बाजार समितीसह सर्वच सहकारी संस्थांच्या निवडणुकांची लवकरच सुरु होणार आहे.

महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था अधिनियम १९६० कलम ७३ (क-क) नुसार राज्य शासनाने राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या. ३१ जानेवारी २०२० ला शेतकरी कर्जमाफीच्या कारणास्तव निवडणुका पुढे ढकलण्यात गेल्या. त्यानंतर कोरोनामुळे १८ मार्च २०२० आणि १७ सप्टेंबर २०२० मुदतवाढ दिली. ही मुदत ३१ डिसेंबरला संपली. सहकार कायद्यानुसार आपत्तकाली परिस्थितीत निवडणुका कमीत कमी सहा महिने तर जास्तीत जास्त एक वर्ष पुढे ढकलता येतात. त्यानंतर कायद्यात सुधारणा करावी लागते. तशी सुधारणा न केल्याने निवडणुका घेण्याचा निर्णय राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने घेतला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER