राज्यातील २२ हजार सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या

Vote

मुंबई :- कोरोनामुळे (Corona) समुह संसर्गाचा धोका आणि तत्पूर्वी शेतकरी कर्जमाफीसाठी सहकारी संस्थांच्या निवडणुका आतापर्यंत तीन वेळा पुढे ढकलण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. राज्य शासनाने मंगळवारी नवा आदेश काढत ३१ डिसेंबर २०२० पर्यंत राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका ३१ डिसेंबर २०२० पर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील २२ हजार सहकारी संस्थातील संचालकांना मुदतवाढ मिळणार आहे.

महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था अधिनियम १९६० कलम ७३ (क-क) नुसार राज्य शासनाने राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. याबाबत सहकार विभागाचे अवर सचिव रमेश शिंगटे यांनी मंगळवारी आदेश काढला. शेतकरी कर्जमाफीच्या कारणास्तव राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका यापूर्वी ३१ जानेवारी २०२० पासून तीन महिन्यांसाठी पुढे गेली होती. दरम्यान, कोरोना महामारीचे संकट आल्याने १८ मार्च २०२०ला पुन्हा तीन महिन्यांची मुदतवाढ दिली. ही मुदत १७ सप्टेंबर २०२० रोजी संपली होती. आतापुन्हा ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

सहकार कायद्यानुसार आपत्तकाली परिस्थितीत निवडणुका पुढे ढकलण्यास राज्य सरकारला अधिकार आहेत. त्यानुसार कमीत कमी सहा महिने तर जास्तीत जास्त एक वर्ष निवडणुका पुढे ढकलता येतात. राज्यातील अ, ब, क व ड प्रवर्गातील २२ हजार ६८० सहकारी संस्थांच्या निवडणुका ३१ डिसेंबर २०२०पर्यंत पुढे गेल्या आहेत. यासंस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया जानेवारी २०२१मध्येच राबवावी लागेल किंवा कायद्यात बदल करावा लागणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER