राज्यातील 45 हजार सहकारी संस्थांच्या निवडणुका 31 मार्चपर्यंत स्थगित

Election

पुणे : सहकारी संस्थांच्या निवडणुकांवर ( co-operative elections) घालण्यात आलेली स्थगिती उठविल्यानंतर काही सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरू होण्याच्या मार्गावर असतानाच शासनाने सहकारी संस्थांच्या निवडणुका दि. 31 मार्चपर्यंत (31 March)पुन्हा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे 45 हजार संस्थांच्या निवडणुकांसाठी गेल्या काही दिवसांपासून सुरू झालेल्या हालचाली मंदावणार आहेत.

लॉकडाऊन काळात मुदत संपलेल्या सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. कोरोनाचा संसर्ग कमी होऊ लागल्यानंतर टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन शिथिल करत व्यवहार सुरू करण्यात आले. शाळा, महाविद्यालये सुरू करण्यात आली. या काळात अनेक सहकारी संस्थांच्या संचालक मंडळांची मुदत संपली होती. त्यामुळे मुदत संपलेल्या या सहकारी संस्थांच्या निवडणुकांकडे लक्ष लागून राहिले होते.

राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुकांबाबत दि. 18 मार्च 2020 रोजी पहिला आदेश काढण्यात आला. या आदेशाद्वारे मुदत संपलेल्या सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका दि. 17 जूनपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या. त्यानंतर पुन्हा दि. 16 सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या. सप्टेंबरमध्ये निवडणुका जाहीर होतील, या अपेक्षेने सहकारामध्ये काम करणारे कार्यकर्ते कामाला लागले; पण दि. 28 सप्टेंबर 2020 रोजी पुन्हा एक आदेश काढून दि. 31 डिसेंबर 2020 पर्यंत सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या.

डिसेंबर संपल्यानंतर सहकारी संस्थांच्या निवडणुकांना दिलेली स्थगिती उठविण्यात आली. त्यानुसार सहकारी खात्याने निवडणुकीची प्रक्रिया राबविण्यास नुकतीच सुरुवात केली होती. दरम्यान, सहकार खात्याने पुन्हा दि. 31 मार्चपर्यंत निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. स्थगिती उठविण्यात आल्यानंतर ज्या सहकारी संस्थांच्या निवडणुका ज्या टप्प्यावर स्थगित करण्यात आल्या, त्या टप्प्यापासून निवडणूक प्रक्रिया नव्याने चालू करून ती पूर्ण करावी, असे सहकार विभागाने काढलेल्या आदेशात म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER