मणिपूरच्या काँग्रेस आमदाराची निवडणूक हायकोर्टाकडून रद्द

Okram Henry Singh - High Court of Manipur
  • प्रतिज्ञापत्रात अपूर्ण माहिती दिल्याचा परिणाम

इम्फाळ : मणिपूरमधील सध्याच्या ११ व्या विधानसभेवर वांगखेई मतदारसंघातून निवडून आलेले काँग्रेसचे (Congress) आमदार ओकराम हेनरी सिंग (Okram Henry Singh) यांची निवडणूक मणिपूर उच्च न्यायालयाने (High Court of Manipur) अवैध ठरवून रद्द केली आहे. मार्च २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत हेनरी सिंग तिहेरी लढतीत ४,३३६ मताधिक्याने निवडून आले होते.

निवडणुकीत हेनरी सिंग यांच्याकडून पराभूत झालेले भारतीय जनता पार्टीचे उमेदवार युमखाम एराबोट सिंग यांनी केलेली याचिका मंजूर करून न्या. एम. व्ही. मुरलीधरन यांनी हा निकाल दिला. न्यायालयाने हेनरी सिंग यांची निवडणूक रद्द करण्याखेरीज त्यांच्याऐवजी युमखाम एराबोट सिंग विजयी झाल्याचेही जाहीर केले. अशा प्रकारे हेनरी सिंग यांची आमदारकी संपुष्टात येऊन युमखाम एराबोट सिंग हे वांगखेई मतदारसंघाचे नवे आमदार झाले आहेत.

हेनरी सिंग यांनी त्यांच्या उमेदवारी अर्जासोबत केलेल्या प्रतिज्ञपत्रात त्यांच्या पत्नीविषयीची माहिती दिली नव्हती. त्यांच्याविरुद्ध प्रलंबित असलेल्या दोन खटल्यांची माहिती दिली नव्हती व स्वत:ची शैक्षणिक अर्हता चुकीची दिली होती. अशा प्रकारे त्यांनी निवडणुकीत मतदारांना गैरमार्गाने प्रभावित करून मते मिळविली, असा ठपका ठेवून त्यांची निवडणूक रद्द केली गेली; शिवाय युमखाम एराबोट सिंग यांच्या निवडणूक एजंटाने निवडणूक अर्जांच्या छाननीच्या वेळी हे सर्व आक्षेप उपस्थित करूनही ते मान्य न करता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी हेनरी सिंग यांचा उमेदवारी अर्ज चुकीच्या पद्धतीने वैध ठरवून स्वीकारला, हाही निवडणूक रद्द करण्यासाठी एक आधार मानला गेला. आधीच्या निवडणुकीच्या वेळी केलेल्या प्रतिज्ञापत्रात हेनरी सिंग यांनी स्वत:ची शैक्षणिक अर्हता पंजाब विद्यापीठाची बी. ए. पदवी अशी दिली होती. आताच्या निवडणुकीत त्यांनी शैक्षणिक अर्हता ‘इयत्ता १२ वी उत्तीर्ण’ अशी दिली होती. १२ वी इयत्तेतील उत्तीर्णता इंग्रजीत संक्षेपाने ‘बी. ए.’ अशी लिहिली जाते, या गैरसमजापोटी गेल्या निवडणुकीतील प्रतिज्ञापत्रात तसे लिहिले होते. परंतु या वेळी ती चूक सुधारून आपण खरी शैक्षणिक अर्हता लिहिली, असा त्यांचा बचाव होता. अर्थातच तो न पटणारा असल्याने फेटाळला गेला. हेनरी सिंग यांनी प्रतिज्ञापत्रात त्यांच्यावरील ज्या दोन प्रलंबित खटल्यांची माहिती दिली नव्हती त्यातील एक १० लाख रुपयांचा चेक न वटण्यासंबंधीचा तर दुसरा सात खोकी भरून अमलीपदार्थांची कोलकात्याहून इम्पाळला वाहतूक केल्यासंबंधीचा आहे.

येथे हे उल्लेखनीय आहे की, वांगखेई मतदारसंघातून लागोपाठ दुसऱ्यांदा निवडून आलेले हेनरी सिंग अवघे ३५ वर्षांचे आहेत व न्यायालयाकडून त्यांची निवडणूक रद्द करवून घेणारे युमखाम एराबोट सिंग ८१ वर्षांचे आहेत.

-अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button