नव्या वर्षात जिल्हाभर इलेक्शन फीव्हर

Vote

कोल्हापूर : येत्या २०२१ या अख्ख्या वर्षात जिल्हाभर इलेक्शनचा फीव्हर अनुभवावयास मिळणार आहे. महापालिका, गोकुळ, जिल्हा बँक, ग्रामपंचायती, सहकारी बँका, साखर कारखाने, नगरपालिका, बाजार समित्या आदी सर्वच महत्त्वाच्या संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. संपूर्ण वर्ष गावकीच्या भावकीचे, गटबाजीचे अन्‌ आचारसंहितेतच जाणार हे स्पष्ट आहे. यानिमित्ताने नव्या-नव्या राजकीय समीकरणांनी जिल्ह्याचे राजकारणही ढवळून निघणार आहे.

सरते संपूर्ण वर्ष कोरोनान (Corona) वाया घालवले. सरत्या आणि येणाऱ्या अशा दोन्ही वर्षांतील मुदत संपलेल्या संस्थांच्या निवडणुकांचा बॅकलॉग या वर्षात भरला जाईल. कोरोनामुळे वर्षभर विकासकामांना कात्री लागली. आता येणारे नवे वर्षभर आचारसंहितेचा फटका विकासकामांना बसण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षभरात बदललेल्या राजकीय समीकरणांच्या पार्श्‍वभूमीवर स्थानिक पातळीवरील नेत्यांना मोठी कसरत करावी लागणार आहे.वर्षानुवर्षे एकमेकांच्या समोरासमोर उभे ठाकणारे शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी एकत्रित आल्याने तालुक्यासह गावा-गावातील राजकारणाचे चित्र बदलले आहे.

सध्या ग्रामीण भागात ४३३ ग्रामपंचायतींसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. शहरात महापालिका निवडणुकांची रंगत वाढल्याने ऐन थंडीत राजकीय वातावरण तापत आहे. जिल्ह्याच्या राजकारणाची दिशा ठरविणाऱ्या महापालिकेसह गोकुळ दूध संघ आणि जिल्हा बँकेची निवडणूक हाय होल्टेज्‌ ठरणार आहे. छत्रपती राजाराम कारखाना, शरद, तात्यासाहेब कोरे-वारणा, डॉ. डी. वाय. पाटील व दत्त असुर्ले-पोर्ले या साखर कारखान्यांचे निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. भ्रष्ट कारभाराचा ठपका ठेवून भरखास्त झालेल्या बाजार समितीची निवडणूक लक्षवेधी असेल. जून २०२१ पर्यंत जिल्ह्यातील अडीच हजार सहकारी संस्थाच्या निवडणुकीची रणधुमाळी पूर्ण होणार आहे. त्यामध्ये १५०० दूध संस्था, ९२५ विकास संस्था, २४ नागरी बँकांचाही समावेश आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER