खडसेंना पक्षात घेण्यास पवारांसह सर्वच नेते उत्सुक; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा दावा

Eknath Khadse-Sharad Pawar.jpg

जळगाव : मागील काही दिवसांपासून भाजपचे नाराज ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) हे राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षात जाणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. याचे कारण म्हणजे खडसे काही दिवसांपासून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर गंभीर आरोप करत थेट हल्लाबोल करत आहेत. राज्यात भाजपला सत्तेपासून दूर राहण्याचे खापर त्यांनी फडणवीसांवर फोडले आहे.

या सर्वांमुळे खडसेंच्या पक्षांतराच्या चर्चेला उधाण आले आहे. अशातच नुकतीच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उत्तर महाराष्ट्रातील नेत्यांची एक महत्त्वाची  बैठक शरद पवार यांनी घेतली होती.  या बैठकीत एकनाथ खडसे यांच्या प्रवेशाबद्दल चर्चा झाल्याची माहिती पुढे आली होती. आता खडसेंच्या पक्षप्रवेशाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासह इतर नेत्यांचा विरोध नसल्याची माहिती आहे. एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाला आपला कोणताही विरोध नाही.

उलट ते आल्यास पक्षाला राज्यात मोठा फायदा होईल, असे मत आपण पक्षनेत्यांकडे व्यक्त केल्याचे  माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गुलाबराव देवकर यांनी सांगितले. देवकर म्हणाले की, खडसे यांच्या पक्षप्रवेशावर जिल्ह्यात कोठे कोठे व राज्यात कसा फायदा होईल हे जिल्ह्यातील नेत्यांनी सांगितले. त्यावेळी आपणही त्यांच्या पक्षप्रवेशामुळे जळगाव ग्रामीण मतदारसंघासह राज्यात फायदा होईल, असे सांगितले. त्यांच्या प्रवेशाला माजी मंत्री यांनी विरोध केला असे सांगितले जात आहे, ते चुकीचे आहे. आपण त्यांच्या पक्षप्रवेशाला कोठेही विरोध केला नाही, असेदेखील देवकर यांनी स्पष्ट केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER