राष्ट्रवादीच्या बळकटीसाठी नाथाभाऊंची रणनीती, जळगावला जाताना ठिकठिकाणी समर्थकांची भेट घेणार

Eknath Khadse

मुंबई : भाजपचा (BJP) राजीनामा देऊन जेष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी कन्या रोहिणीसह शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश केला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी त्यांचे स्वागत करून पक्षात घेतले. यावेळी शरद पवार यांनी उत्तर महाराष्ट्रात पक्षाच्या बळकटीसाठी नाथाभाऊंचा अनुभव कामी पडणार. त्यांच्या येण्याने पक्षाला नवी ऊर्जा मिळणार अशी, अपेक्षा व्यक्त केली.

तर दुसरीकडे एकनाथ खडसे यांनीही पवारांच्या अपेक्षांना खरे उतरण्याची ग्वाही दिली. भाजपासाठी जितक्या निष्ठेने काम केलं, तितकंच राष्ट्रवादीसाठी करेन, राष्ट्रवादी काँग्रेसने काहीही दिलेलं नाही. मी केवळ पक्षाचं काम करेल. जितकं काम भाजपचं केलं, त्याच्या दुप्पट वेगाने राष्ट्रवादी काँग्रेस वाढवू. हे करुन दाखवू. माझ्या पाठीशी ठाम उभे राहा, मी कुणालाही घाबरणार नाही, अशी ग्वाही खडसे यांनी पवारांना दिली.

दरम्यान, पक्षप्रवेशाच्या दुसऱ्याच दिवसापासून एकनाथ खडसे ऍक्शन मोडवर आले आहेत. ते आज सकाळी मुंबईहूनमुक्ताईनगरच्या दिशेने रवाना झाले आहेत. मात्र हा प्रवास करताना राष्ट्रवादीच्या बळकटीसाठी त्यांनी मोठी रणनीती आखली आहे. ते सध्या मुंबईहून जळगावच्या दिशेने निघाले असून ठिकठिकाणी थांबून समर्थकांशी आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत. प्रवासादरम्यान, तालुक्याच्या ठिकाणी काही वेळ थांबून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि समर्थकांमध्ये भेट घडवून आता एकत्र काम करण्याच्या सूचनाही देणार आहे. त्यांच्या या रणनीतीमुळे निश्चितच त्यांचे समर्थक आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये समन्वय निर्माण होऊन पक्षाच्या वाढीसाठी मदत होणार आहे. त्यांचं ठिकठिकाणी स्वागत होत असल्याचेही दिसून येत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER