एकनाथ खडसेंना कोरोनाची सौम्य लक्षणे; १४ दिवसांनी ईडीसमोर हजर होणार !

ED - Eknath Khadse

मुंबई :  राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना  आज ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस मिळाली होती. मात्र ते आज हजर राहणार नाहीत. कोरोनाची सौम्य लक्षणे असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने विश्रांती घेणार असून त्यानंतर चौकशीसाठी हजर होण्यासाठी ईडीकडून संमती मिळाली आहे, अशी माहिती एकनाथ खडसे यांनीच पत्रकाद्वारे दिली आहे.

दरम्यान, ईडी चौकशीच्या निमित्ताने एकनाथ खडसे कालच मुंबईत दाखल झाले होते.मागील दोन दिवसांपासून खडसे यांना  ताप, सर्दी आणि खोकला जाणवत आहे. कोरोनासदृश  लक्षणे जाणवत असल्याने चाचणी केली असून अहवाल यायचा आहे. त्यामुळे डॉक्टरांनी १४ दिवसांच्या विश्रांतीचा सल्ला दिला आहे. याबाबत ईडीला कळवलं असून त्यांनी १४ दिवसांनी चौकशीसाठी हजर राहण्याची परवानगी दिली आहे, असं खडसे यांनी पत्राच्या माध्यमातून सांगितलं आहे. एकनाथ खडसे यांनी जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, दिनांक ३० डिसेंबर २०२० रोजी मुंबई येथील कार्यालयात उपस्थित होण्याबाबत सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) समन्स प्राप्त झाले होते.

ईडी कार्यालयाकडे खुलासा सादर करण्यासाठी दिनांक ३० डिसेंबर रोजी हजर होणार होतोच. मात्र मध्यंतरी २८ डिसेंबर रोजी ताप, सर्दी, कोरडा खोकल्याचा त्रास सौम्य प्रमाणात जाणवला. वैद्यकीय तपासणीअंती कोरोनासदृश लक्षणे असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. कोरोनाची चाचणी घेतली. निष्कर्ष अद्याप प्रलंबित आहेत. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार १४ दिवस विश्रांती आवश्यक आहे. तसे ईडी कार्यालयास कळवले आहे. त्यांनी १४ दिवसांनंतर हजर होण्याबाबत संमती दिलेली आहे. माझी प्रकृती बरी झाल्यावर सक्तवसुली संचालनालयास (ईडी) पूर्ण सहकार्य करणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER