राज्यपालांनी निर्णय घ्यावा, एकनाथ खडसे आमदार होतील : जयंत पाटील

Eknath Khadse - Jayant Patil

जळगाव : एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या आमदारकीबाबत बोलताना राष्ट्रवादीचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. जर राज्यपालांनी एकदाचा निर्णय घेतला तर एकनाथ खडसे आमदार होतील, असं सूचक विधान केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सध्या राज्यभरात दौरा करत आहेत. सध्या ते जळगाव दौऱ्यावर आहेत. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी ते म्हणाले की, २०१९ च्या निवडणुकांदरम्यान या भागात प्रचारासाठी आलो होतो. तेव्हा सत्तेत आलो, तर पाडळसरे धरणाचं काम पूर्ण करू असं आश्वासन दिलं होतं. महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) सत्ता येईल, मी जलसंपदा मंत्री होईल याचा विचारही केला नव्हता. मात्र योगायोगाने ही जबाबदारी माझ्यावर आली. आता एकनाथ खडसे यांच्या हस्ते या धरणाचं भूमिपूजन झालं आहे. राज्यपालांनी निर्णय घेतला तर खडसे आमदार होतील आणि त्यांच्याच हस्ते या धरणाचं उद्घाटन केलं जाईल, अशी ग्वाहीदेखील जयंत पाटील यांनी दिली.

पाडळसरे धरण लवकर पूर्ण करावं असा प्रयत्न या सरकारचा असून त्यासाठी या धरणाच्या कामाचं नियोजन काय आहे, यासाठी धरणाला भेट दिली आहे. या धरणाच्या कामाला गती देण्यासाठी येणाऱ्या अर्थसंकल्पात अधिक तरतूद करणं, केंद्रीय मदतीची योजना त्यात बसवणं, हा आमचा प्रयत्न असणार असल्याचं जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी पाडळसे धरण आढावा बैठकीत बोलताना सांगितलं. मराठवाड्याचे प्रश्न लगेच सोडवले जातात. मात्र खानदेशाकडे दुर्लक्ष होत आहे. खानदेशात आपण कमी पडत आहात का? याबाबत बोलताना जयंत पाटील यांनी सांगितलं की, नुकताच या भागाचा दौरा केला असून जळगाव, नंदुरबार, नाशिक या भागांतील प्रकल्पांना गती देण्याचं काम केलं जात आहे. तसेच या भागांसाठी अधिक निधी कसा उभा केला जाईल यासाठी आम्ही प्रयत्न करत असून नियमित अर्थसंकल्पीय तरतुदींच्या पलीकडे जाऊन राज्यपालांच्या मर्यादेत अधिकचा निधी मिळवून प्रकल्प पूर्ण करण्याचे प्रयत्न करू, असेही पाटील म्हणाले.

राज्यपालांना आज विमान प्रवास करण्यास नकार देण्यात आला होता. या विषयावर बोलताना जयंत पाटील म्हणाले की, राज्यपालांना विमान प्रवास का नाकारण्यात आला याबाबत आपल्याला माहीत नाही आणि तसं करण्याचं काही कारणंही वाटत नाही, मात्र काही तांत्रिक कारणावरून असं झालं असू शकेल. अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER