राष्ट्रवादीत जाण्यावर खडसेंकडून संकेत, जयंत पाटलांच्या ट्विटला रिट्विट करत मोदींवर निशाणा

jayant Patil-Eknath Khadse

मुंबई :- भाजपा नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे संकेत शरद पवारांनी दिले होते, त्यानंतर आता खुद्द एकनाथ खडसेंनी सोशल मीडियाच्या माध्यमातून राष्ट्रवादी प्रवेशाचे संकेत दिले आहेत. एकनाथ खडसे यांनी बुधवारी राष्ट्रवादीच्या जयंत पाटील यांनी केलेले एक ट्विट रिट्विट केले. या ट्विटमध्ये जयंत पाटील (Jayant Patil) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर टीका केली होती. एकनाथ खडसे यांनी हे ट्विट रिट्विट करून पहिल्यांदाच भाजपविरोधी भूमिका घेतली आहे.

जयंत पाटील यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं की, आजच्या भाषणात पंतप्रधान काहीतरी नवीन सांगतील, कोरोना व आर्थिक संकटावर मात करण्यासाठी मार्ग देतील, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलासा देतील असं वाटलं होतं. मात्र यापैकी त्यांनी काहीच केले नाही. महाराष्ट्राचा, देशाचा भ्रमनिरास केला! असा आरोप त्यांनी नरेंद्र मोदींवर केला होता, मात्र उत्सुकता म्हणजे एकनाथ खडसेंनी हे ट्विट रिट्विट केलं. त्यामुळे एकनाथ खडसेंचा राष्ट्रवादी प्रवेश जवळपास निश्चितच झाल्याचं दिसून येत आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार एकनाथ खडसे गुरुवारी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश करणार आहेत. त्यासाठी खडसेंचा बालेकिल्ला असणाऱ्या मुक्ताईनगरात कालपासून तयारीला सुरुवातही झाली होती. एकनाथ खडसे यांच्या समर्थकांनी बॅनरवरुन कमळ गायब केलं आहे. खडसेंच्या मुक्ताईनगरात समर्थकांनी बॅनरबाजीला सुरुवात केली आहे. “नाथाभाऊ तुम्ही बांधाल तेच तोरण, तुम्ही ठरवाल तेच धोरण” असे बॅनर समर्थकांनी झळकावले आहेत. एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशासाठी कार्यकर्त्यांनी मुंबईला जाण्यासाठी आपल्या गाड्यांवरती स्टिकर्स लावले आहेत.

ही बातमी पण वाचा : एखादी गोष्ट सत्यात उतरत नाही तोपर्यंत… एकनाथ खडसेंच्या पक्षप्रवेशावर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER