
मुंबई : विधानपरिषद आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यातील आपल्या विस्तारासाठी ‘राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा‘ सुरु केली आहे. या यात्रेच्या माध्यमातून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर आणि राष्ट्रवादी युवा ब्रिगेड संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करत आहेत.
ही यात्रा आता खान्देशात पोहोचणार आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या संवादयात्रेमुळे कार्यकर्त्यांमध्ये एक नवचैतन्य निर्माण होईल, असे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.
राष्ट्रवादीच्या संवाद यात्रेचं 11 तारखेला जळगाव जिल्ह्यामध्ये आगमन होईल. यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद तर साधलाच जाणार आहे पण अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होणार आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी काही छोटेखानी सभांचे आयोजन केले गेले आहे. या यात्रेने कार्यकर्ते, नेते आणि पदाधिकारी यांच्यात नवचैतन्य निर्माण होईल, असे एकनाथ खडसे म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभर संवाद यात्रा सुरु आहे. या यात्रेच्या निमित्ताने कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याचं काम सुरु आहे. विदर्भाचा दौरा आटपून ही यात्रा खान्देशात येत आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये 11 फेब्रुवारी आणि 12 फेब्रुवारीला संवाद यात्रा येणार आहे. याच पार्श्वभूमीवर जळगावातील राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्ते कामाला लागले.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला