नाराज नाही – एकनाथ खडसे

मुंबई :- भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आज विधानभवनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, मी नाराज असल्याची बातमी चूक आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या नेत्यांशी माझी जवळीक आहे. माझ्यासारखा कार्यकर्ता आल्यास आपल्याला फायदा होईल असं त्यांना वाटत असावं. पण याबाबत मी कोणताही निर्णय घेतलेला नाही. या संदर्भात उल्लेखनीय आहे की, खडसे त्यांच्या वागण्या – बोलण्यातून गेल्या काही दिवसांपासून पक्षाबाबत नाराज असल्याचे संकेत देत आहेत. त्यांनी शरद पवारांचीही भेट घेतली आहे. आज मात्र त्यांनी त्यांच्या वागण्या-बोलण्याला छेद देणारे वक्तव्य केले. ते म्हणाले की, शरद पवार यांची भेट मी जळगावमधील सिंचन प्रकल्पाविषयी चर्चा करण्यासाठी घेतली.

आमच्या विरोधात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांविरोधातील पुरावे पक्षाकडे सुपूर्द : एकनाथ खडसे

उद्धव ठाकरेंशीही त्याबाबतच चर्चा केली. १२ तारखेला गोपीनाथ गडावर पंकजा मुंडे यांच्याकडून स्वाभिमान मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. त्याचं निमंत्रणही ठाकरेंना दिलं. गोपीनाथ मुंडे यांचं स्मारक औरंगाबाद येथे उभारण्यासाठी मी जमीन उपलब्ध करून दिली होती.

मात्र स्मारक अद्याप उभं राहू शकलेलं नाही. या स्मारकासाठी ३० ते ४० कोटींचा खर्च आहे. याबाबत आपणाकडून घोषणा व्हावी अशी विनंती मी उद्धव ठाकरे यांना केली, असे खडसे यांनी सांगितले.