एकनाथ खडसेंना पक्षात घेण्यास शरद पवार अनुकूल, आमदारकी देणार?

Sharad Pawar & Eknath Khadse

जळगाव : राज्यात भाजप-शिवसेनेचा काडीमोड झाल्यानंतर शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी एकत्र येत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. त्यामुळे सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सुगीचे दिवस आले आहे. राष्ट्रवादीत जोरदार इनकमिंगसुरू झाले असून, आता राष्ट्रवादीने भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्याकडे लक्ष्य केंद्रित केले आहे.

पक्षातील नेत्यांवर जाहीरपणे टीका करत असल्याने एकनाथ खडसे पक्षावर जाम नाराज असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे अश्या जेष्ठ नेत्याला पक्षात घेण्यासाठी राष्ट्रवादीकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. यासाठी खुद्द पक्षाध्यक्ष शरद पवारही अनुकूल असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली असून, पवारांनी खडसेंना पक्षात घेण्याची जबाबदारी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर सोपवल्याची माहिती पुढे आली आहे. याबाबतचे वृत्त सरकारनामाने प्रकाशित केले आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर जयंत पाटील पुढील आठवड्यात जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून ते येथे बैठक घेणार आहेत. या दौऱ्यात ते भाजप नेते एकनाथ खडसे यांच्या पक्ष प्रवेशाबाबत ते चाचपणी करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. सध्या एकनाथ खडसे आपल्याच पक्षाच्या नेत्यांच्या विरोधात आक्रमक झाले आहेत. गेल्या आठवड्यात एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यात त्यांनी पक्षाचे नेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट नाव घेवून हल्ला केला होता. फडणवीस यांनी आपल्याला त्रास दिला असे ते जाहीरपणे बोलले. यानंतर खडसे यांनी पक्ष सोडण्याबाबत थेट भूमिका घ्यावी, अशी प्रतिक्रिया राजकीय वर्तुळातून उमटू लागली आहे.

राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी त्यांना थेट शिवसेनेत येण्याचे आवाहन केले होते. खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा या आधीपासूनच सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यात जोरदार इन्कमिंग करीत आहे. त्यामुळे एकनाथ खडसे जर पक्षात प्रवेश करीत असतील तर त्याचा फायदा पक्षाला उत्तर महाराष्ट्र तसेच जळगाव जिल्ह्यात किती होईल, याबत जयंत पाटील पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विधानरिषदेतील काही जागा ऑक्टोबर महिन्यात रिक्त होत आहे. त्यातील चार जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला येणार आहेत. त्यापैकी एका जागेवर खडसे यांना घेण्याचा विचार सुरू आहे. यासाठी शरद पवारही अनुकूल असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. जयंत पाटील २३ रोजी जळगाव दोऱ्यावर येण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी पक्षाचे जळगाव जिल्हा अध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील यांनी या दौऱ्याला दुजोरा दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER