पवारांच्या उपस्थितीत कन्या रोहिणीसह खडसेंचा राष्ट्रवादीत प्रवेश २२ तारखेला?

Sharad Pawar-Eknath Khadse

मुंबई :- भाजपमध्ये नाराज असलेले माजी मंत्री एकनाथ खडसे हे लवकरच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत पक्षांतर करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. खडसेंसह त्यांची कन्या रोहिणी खडसे-खेवलकर यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची तारीख ठरली आहे.

एकनाथ खडसे (Eknath Khadse) हे २२ ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत खडसे यांचा प्रवेश होणार आहे. मुंबईतील प्रदेश कार्यालयात हा प्रवेश सोहळा संपन्न होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

एकनाथ खडसे यांच्या जाण्यामुळे भाजपला धक्का बसणार आहे हे निश्चित आहे. पण खडसे यांच्या कन्या आणि जळगाव जिल्हा बँक अध्यक्ष रोहिणी खडसे या सुद्धा राष्ट्रवादीत प्रवेश करून दुसरा धक्का देणार आहे. एवढंच नाहीतर एकनाथ खडसे यांच्याकडून त्यांच्या समर्थकांना २२ ऑक्टोबरला १० वाजता राष्ट्रवादी कार्यालयात येण्याचं आवाहन सुद्धा केले आहे, अशी माहिती समोर आली आहे.

विशेष म्हणजे, शरद पवार यांनी सोमवारीच एकनाथ खडसे यांच्या पक्षप्रवेशाबद्दल सूचक विधान केले होते. ‘एकनाथ खडसे विरोधीपक्ष नेते होते. राज्याचे अर्थमंत्री होते. एक नेता म्हणून खडसे यांचे मोठे योगदान आहे. ते आम्ही पाहिले आहे. आणि त्यामुळे त्याचं कर्तृत्व, जबाबदारी आम्ही पाहिले आहे. त्यामुळे राजकीय निर्णय काय घ्यायचा आहे, तो त्यांना पाहावा लागणार आहे, असं पवार म्हणाले होते. त्यामुळे राष्ट्रवादीकडून निर्णय झाला आहे, फक्त खडसेंच्या निर्णयाची औपचारिकता बाकी होती. अखेर त्यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे.

दरम्यान, नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. मात्र विजयादशमी किंवा त्याआधी खडसे पक्षांतर करत मोठा भाजपला धक्का देतील, असे आता सांगितले जाते आहे. तर दुसरीकडे खडसे यांची सून रक्षा खडसे रावेरच्या खासदार आहेत. दुसऱ्यांदा खासदार झालेल्या रक्षा खडसे यांच्याकडे भाजपने महाराष्ट्र कार्यकारिणीत मंत्रिपदाची जबाबदारी दिली आहे. दुसऱ्या टर्ममध्ये केवळ दीड वर्ष झाल्याने रक्षा खडसे भाजपमध्येच राहतील आणि उर्वरित चार वर्षे पूर्ण करतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER